कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) प्ले ऑफ गाठण्याच्या आशा कायम राखताना चेन्नई सुपरकिंग्जला ६ गड्यांनी नमवले. चेन्नईला २० षटकांत ६ बाद १४४ धावांवर रोखल्यानंतर कोलकाताने १८.३ षटकांत ४ बाद १४७ धावा केल्या. कर्णधार नितिश राणा आणि रिंकू सिंग यांची अर्धशतकी खेळी कोलकातासाठी मोलाची ठरली.
लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताची पाचव्या षटकात ३ बाद ३३ धावा अशी अवस्था झाली. येथून कर्णधार नितिश राणा आणि यंदाचे आयपीएल गाजवलेल्या रिंकू सिंग यांनी संघाला विजयी मार्गावर आणत चौथ्या गड्यासाठी ७६ चेंडूंत ९९ धावांची निर्णायक भागीदारी केली. रिंकूने ४३ चेंडूंत ४ चौकार व ३ षट्कारांसह ५४ धावा फटकावल्या. नितिशने ४४ चेंडूंत ६ चौकार व एका षट्कारांसह नाबाद ५७ धावा केल्या. १८व्या षटकात रिंकू धावबाद झाला. यानंतर नितिशने आंद्रे रसेलसोबत (२*) संघाच्या विजयात शिक्का मारला.
चेन्नईविरुद्ध कोलकाताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने दोन विकेट्स घेत चांगली गोलंदाजी केली. याच कामगिरीवर चेन्नई संघाचे प्रशिक्षक फ्लेमिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फ्लेमिंग सामन्यानंतर म्हणाले की, वरूणला संघात न घेतल्याचा खेद आम्हाला अजूनही आहे. त्याने सीएसकेच्या फलंदाजांना अनेक वर्षे नेट प्रॅक्टिसदरम्यान चांगली गोलंदाजी करत त्रास दिला. आम्ही त्याला लिलावात विकत घेऊ शकलो नाही, ही आमची चूक झाली, असं फ्लेमिंग म्हणाले. चक्रवर्तीला २०१९ मध्ये पंजाब किंग्जने ८ कोटी ४० लाखांना विकत घेतले होते आणि २०२०मध्ये केकेआरने त्याला ४ कोटींमध्ये खरेदी केल्यानंतर संघात ठेवले होते.
दरम्यान, कोलकाताने दमदार गोलंदाजी करताना चेन्नईला जखडवून ठेवले. वरुण चक्रवर्थी आणि सुनील नरेन यांनी चेन्नईला मोक्याच्या वेळी जबर धक्के दिले. परंतु, शिवम दुबेच्या झुंजार फटकेबाजीमुळे चेन्नईने समाधानकारक मजल मारली. प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर दुबेने ३४ चेंडूंत नाबाद ४८ धावा फटकावताना १ चौकार व ३ षट्का मारले. त्याने रवींद्र जडेजासोबत सहाव्या गड्यासाठी ५३ चेंडूंत ६८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला पुनरागमन करून दिले जडेजाने २४ चेंडूंत एका षट्कारासह २० धावा केल्या. डीवोन कॉन्वेने २८ चेंडूंत ३ चौकारांसह ३० धावा केल्या चेन्नईचा ७२ धावांवर अर्धा संघ गमावला होता.