मुंबई : बीसीसीआयचे (BCCI) सध्याचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) 18 ऑक्टोबरला बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यासाठी मंगळवारी बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बहुप्रतिक्षित बैठक होणार असून त्यात अनेक महत्त्वाच्या विषयांवर निर्णय होणार आहे. बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी सोमवारी रात्री मुंबईत पोहोचणार असल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी म्हणजेच उद्या बोर्डाची बैठक होणार असून त्यात बीसीसीआयच्या पुढील निवडणुकीवरही चर्चा होणार आहे.
उच्च अधिकारी आज मुंबईत पोहचणार टाइम्स नाउने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयचे अधिकारी उद्या होणाऱ्या बैठकीसाठी आज रात्री मुंबईत पोहचणार आहेत. जिथे बीसीसीआयच्या पुढील निवडणुकांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. लक्षणीय बाब म्हणजे या बैठकीची एक फेरी याआधीच दिल्लीत पार पडली आहे. नवीन बोर्ड अध्यक्षाबाबत माजी मुख्य निवडकर्त्याचे नाव पुढे येत आहे. माहितीनुसार, माजी मुख्य निवडकर्ता बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांची जागा घेण्याची शक्यता आहे. सौरव गांगुलीच्या ऐवजी आता माजी भारतीय क्रिकेटर आणि मुख्य निवडकर्ता रॉजर बिन्नी बीसीसीआयचे पुढील अध्यक्ष होणार असल्याची चर्चा आहे. बिन्नी यांचे नाव फेव्हरेट्सच्या यादीत सर्वात वर असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सौरव गांगुली 18 ऑक्टोबरला होणाऱ्या बीसीसीआयच्या निवडणुकीत भाग घेणार नाहीत. कारण ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदाची निवडणूक लढू शकतात. गांगुली आयसीसी अध्यक्ष म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. या वर्षाच्या अखेरीस आयसीसी अध्यक्षपदासाठीही निवडणूक होणार आहेत. मात्र बीसीसीआयच्या सचिवपदी जय शाह कायम राहतील अशी अपेक्षा आहे.
'दादां'ची जागा कोण घेणार? मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने गांगुली आणि शाह यांचे भवितव्य संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. सर्वोच्च न्यायालयाने BCCI च्या घटनेत बदल करण्यास परवानगी दिली ज्यामुळे BCCI आणि राज्य संघटनांमध्ये प्रशासकाला तीन वर्षांचा कूलिंग ऑफ कालावधी सुरू होण्यापूर्वी तीन वर्षांच्या सलग दोन टर्म करण्याची परवानगी दिली. त्यामुळे या कालावधीत अधिकारी भारतातील कोणत्याही क्रिकेट संस्थेचा भाग असू शकत नाही. आगामी काळात बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे जाते हे पाहण्याजोगे असेल.