पुणे :
शनिवारी मुंबई विरुद्धच्या सामन्यात विराटला पायचित बाद देण्याचा पंचांचा निर्णय वादग्रस्त ठरला. यासंदर्भात आता अनेकांकडून टीकेचा सूर उमटू लागला आहे. आरसीबीच्या डावाच्या १९व्या षटकात ब्रेविसच्या गोलंदाजीवर पंचांनी विराटला पायचित बाद ठरवले. मात्र यानंतर विराटने डीआरएसचा वापर केला. चेंडू पॅड आणि बॅटला एकाच वेळी लागल्याचे रिप्लेमध्ये दिसत होते. मात्र तिसरे पंच चेंडू बॅटला लागला याबाबत आश्वस्त नव्हते. त्यामुळे त्यांनी मैदानावरील पंचाचाच निर्णय कायम ठेवला. याबाबत आरसीबीकडूून अधिकृत प्रतिक्रिया आली. ते म्हणाले, ‘आम्ही एमसीसीच्या पायचितसंबंधी नियमांचा अभ्यास करतो आहोत. कारण इतकी चांगली खेळी केल्यानंतर विराटला अशा पद्धतीने बाद देणे दुर्भाग्यपूर्ण होते.’
एमसीसीचा नियम काय सांगतो?विराटला वादग्रस्त पायचित देण्याबाबत एमसीसीचा नियम लक्षात घेता तो असे सांगतो की, जर चेंडू बॅट आणि पॅडला एकाच वेळी लागला असेल तर अशा वेळी चेंडू आधी बॅटला लागला असेच विचारात घेण्यात येते. म्हणजेच या नियमाच आधार घेता विराटला मुंबईविरुद्धच्या सामन्यात नाबाद ठरवायला हवे होते.