दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals ) इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून ( Lucknow Super Giants ) पराभव पत्करावा लागला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात आयुष बदोनीने चौकार व षटकार मारून लखनौचा विजय पक्का केला. या पराभवाच्या धक्क्यानंतर दिल्ली कॅपिटल्सला १२ लाखांचा दंड भरावा लागला. षटकांचा वेग संथ ठेवल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सवर ही कारवाई केली गेली.
दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वी शॉ ( ६१), रिषभ पंत ( ३९*) व सर्फराज खान ( ३६*) यांच्या खेळीच्या जोरावर ३ बाद १४९ धावांपर्यंत मजल मारून दिली. पण, पृथ्वीने ज्या प्रकारे दिल्लीला आक्रमक सुरुवात करून दिली होती, त्यात सातत्य राखण्यात अन्य फलंदाज अपयशी ठरले. डेव्हिड वॉर्नर व रोव्हमन पॉवेल यांच्या पटापट विकेट पडल्यानंतर लखनौच्या गोलंदाजांनी कमबॅक केले व दिल्लीच्या धावगतीला वेसण घातले. रवी बिश्नोईने २ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात लखनौला क्विंटन डी कॉक व लोकेश राहुल यांनी चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ७३ धावा जोडल्या. क्विंटनने चांगली खेळी केली, परंतु ८० धावांवर तो बाद झाला. दीपक हुडा ( ११), कृणाल पांड्या ( १९*) व बदोनी ( १०*) यांनी लखनौचा विजय पक्का केला.