-अयाज मेमन(कन्सल्टिंग एडिटर)
सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्यापासून प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न घोंगावतो की त्याचे अनेक विक्रम मोडणार कोण? कसोटी असो वा वनडे, सचिन प्रत्येक प्रकारात अव्वल होता. मात्र सध्या सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्ध लॉर्डस कसोटी सामन्यात दोन्ही डावांत शतके झळकावणारा ज्यो रूट सचिनच्या सर्वाधिक कसोटी धावांच्या विक्रमाच्या समीप जाऊन पोहचला आहे. येणाऱ्या काही वर्षांत तो हा विक्रम मोडूदेखील शकतो.
आव्हान खडतरकसोटीत सचिनच्या पुढे कोण जाणार? त्याच्या शतकांना पार करणे तर अशक्य आव्हान आहे. सोबतच त्याच्या कसोटीतील १५,९२१ धावांचा विक्रम मोडणेही जवळपास कठीणच. इंग्लंडचा ज्यो रूट सचिनपेक्षा ३,५४४ धावांनी मागे आहे. विराट कोहली फॉर्ममध्ये आला तर गोष्टी बदलू शकतात. दुसरीकडे केन विल्यमसन मायदेशात चांगला खेळतो, पण परदेशात त्याला यश मिळत नाही. स्टीव्ह स्मिथ तर अत्यंत कठीण काळातून जातो आहे. एकूण सध्यातरी कसोटी आणि वनडे या दोन्ही प्रकारात सचिनचा एकछत्री अंमल कायम आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सध्या सक्रिय असलेल्या फलंदाजांची क्रमवारी ठरवायची झाल्यास माझ्या मते मी रूटला पहिला क्रमांक देईन, त्यानंतर स्मिथ आणि विराटचा नंबर लागेल.सचिनच्या विक्रमांना तोड नाहीहे चारही फलंदाज ३४हून अधिक वयाचे झाले. सर्वजण फार फार तर आणखी सहा वर्षे खेळू शकतील, मग सचिनच्या विक्रमांना मागे टाकण्याचा 'दम' कोणामध्ये आहे? शतकांबाबत बोलाल तर ५१ शतकांचा विक्रम मोडण्याची कुवत कुणातही नाही. आगामी पाच वर्षांत त्यांनी ३०-३५ कसोटी सामने खेळले, प्रत्येक तिसऱ्या सामन्यात शतक ठोकले तरीदेखील ते सचिनच्या जवळपासही पोहोचू शकणार नाहीत.
चार दिग्गजांमध्ये चढाओढ...
सचिनच्या समकालीन एकाही खेळाडूला या महान फलंदाजाच्या जवळपासही जाता आले नाही. अनेकजण निवृत्तदेखील झाले. सध्या चार फलंदाजांमध्ये स्पर्धा आहे. त्यात ज्यो रूट (इंग्लंड), विराट कोहली (भारत), स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) आणि केन विलियम्सन (न्यूझीलंड) यांचा समावेश आहे. चौघांमध्ये गेली दहा वर्षे स्पर्धा पहायला मिळत आहे. कधी विराट तर कधी रूट, तर कधी विलियम्सन, तर कधी स्मिथ पुढे गेला तरीही सचिनचे विक्रम मोडीत निघतील, याची खात्री पटू शकलेली नाही.
वनडेचा राजा सचिनचवनडे क्रिकेटचा विचार केला तर या प्रकारावर सचिनचे अधिराज्य अद्यापही कायम आहे. १८ हजारांपेक्षा जास्त धावा आणि ४९ शतके त्याच्या नावावर आहेत. सचिनने केवळ एक आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला आहे. त्यामुळे हा प्रकार सोडला तर कसोटी आणि वनडेमध्ये सचिन तेंडुलकरच खरा सम्राट आहे.
विक्रमी पन्नास शतके ठोकणारा विराट कोहली १३ हजार ९०६ धावांसह तिसऱ्या स्थानी आहे. सक्रिय असलेल्या खेळाडूंपैकी रोहित शर्मा १० हजार ८८६ धावा (३१ शतक) करत अकराव्या क्रमांकावर आहे.
स्पर्धा कायम...पण स्पर्धा संपलेली नाही. सचिनला मागे टाकण्याची प्रत्येकाची झुंज कायम आहे. ज्यो रुटने लंकेविरुद्ध शनिवारी ३४वे कसोटी शतक ठोकले. सर्वाधिक धावा काढणाऱ्यांमध्ये तो सातव्या स्थानावर येतो. रूट याबाबत प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या फार पुढे निघून गेला.