कौंटी अजिंक्यपद ( County Championship) स्पर्धेत लिसेस्टरशायरच्या लुईस किंबरने ( Louis Kimber ) आज विक्रमांचा पाऊस पाडला. इंग्लंडचा गोलंदाज ऑली रॉबिन्सन याच्या एका षटकात ४३ धावा चोपणाऱ्या किंबरने कौंटी अजिंक्यपद स्पर्धेतील वेगवान द्विशतकाचा विक्रम नावावर केला. त्याने १०० चेंडूंत द्विशतक पूर्ण केले आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे दुसरे वेगवान द्विशतक ठरले.
Sussex vs Leicestershire सामन्यात ससेक्सने पहिल्या डावात ४४२ धावांचा डोंगर उभा केला. लिसेस्टरशायरला पहिल्या डावात २७५ धावाच करता आल्याने ससेक्सने १६७ धावांची आघाडी घेतली. ससेक्सच्या सीन हंटने ४, तर रॉबिन्सनने तीन विकेट्स घेतल्या. ससेक्सने दुसरा डाव ६ बाद २९६ धावांवर घोषित करून ४६४ धावांचे लक्ष्य ठेवले. दुसऱ्या डावात ससेक्सकडून टॉम हायनेस ( ४५), कार्टर ( ३१), सीन हंट ( ६५), अल्सोप ( ८१) व जेम्स कोलेस ( ४५) यांनी चांगली फलंदाजी केली. लिसेस्टरशायरचा संघ ७ बाद १७५ धावा असा गडगडला. तेव्हा लुईस किंबर व बेन कॉक्स यांनी मोर्चा सांभाळला.
लुईस किंबरने १०० चेंडूंत द्विशतक पूर्ण केले आणि कौंटी अजिंक्यपद स्पर्धेतील हे वेगवान द्विशतक ठरले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान द्विशतकाच्या विक्रमात किंबरने दुसरे स्थान पटकावले. शफिकुल्लाहने काबुल रिजन विरुद्ध बूस्ट रिजन लढतीत २०१८ साली ८९ चेंडूंत द्विशतक झळकावले होते. किंबरने त्याच्या आजच्या खेळीत १९ षटकार खेचले आणि कौंटी अजिंक्यपद स्पर्धेत एका डावात सर्वाधिक षटकारांचा बेन स्टोक्सचा विक्रम मोडला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकाही फलंदाजाला डावात ११ हून अधिक षटकार खेचता आलेले नाहीत. हे वृत्त लिहित असताना किंबर ११३ चेंडूंत २२७ धावांवर नाबाद होता आणि लिसेस्टरशायरच्या ८ बाद ४२६ धावा झाल्या होत्या आणि त्यांना विजयासाठी ३८ धावा हव्या होत्या. किंबरने या २२७ धावांपैकी १९४ धावा या फक्त ३९ चेंडूंत चौकार ( २०) व षटकारांनी ( १९) कुटल्या आहेत.
Web Title: THE FASTEST DOUBLE-CENTURY IN COUNTY CHAMPIONSHIP HISTORY! Louis Kimber hits the second-fastest double hundred in first-class cricket, off just 100 balls
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.