लंडन : ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज डेव्हिड वाॅर्नर याने गुरुवारपासून ओव्हल येथे सुरू शेवटच्या कसोटी सामन्याआधी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची शक्यता फेटाळून लावली आहे. मात्र, त्याचवेळी पुढील वर्षी कसोटीला अलविदा करणार असल्याचेही त्याने सांगितले.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वाॅनने याने ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीदरम्यान पाचवी ॲशेस कसोटी वाॅर्नरची अखेरची कसोटी असेल अशी कुजबुज ऐकल्याचे सांगितले होते. वाॅर्नरने ही शक्यता फेटाळून लावली आहे.
एका क्रिकेट संकेतस्थळाशी संवाद साधताना वाॅर्नरने सांगितले की, ‘मी कोणतीही घोषणा करणार नाही. पाकविरुद्धच्या मालिकेनंतर कसाेटी क्रिकेट खेळणार नाही.’ ३६ वर्षीय वाॅर्नरने मागील महिन्यात सांगितले होते की, ‘पाकिस्तानविरुद्ध मायदेशात होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेनंतर निवृत्तीची घोषणा करणार आहे.’ नववर्षात शेवटचा कसोटी सामना सिडनी येथे घरच्या चाहत्यांसमोर खेळण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले होते.
वाॅर्नरने स्टिव्ह स्मिथच्या निवृत्तीचीही शक्यता व्यक्त केली होती. वाॅर्नरने अशा शक्यता गांभीर्याने घेत नसल्याचे म्हटले होते.
पाचव्या ॲशेससाठी इंग्लंडचा संघ कायम
इंग्लंडने ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या अखेरच्या पाचव्या ॲशेस कसोटी सामन्यासाठी बुधवारी संघात कोणताही बदल केला नाही.
पाचव्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा सर्वांत यशस्वी गोलंदाज जेम्स अँडरसन वयाची ४१ वर्षे पूर्ण करणार आहे. या मालिकेत आतापर्यंत निराशाजनक कामगिरी केल्यानंतरही तो संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.
वेगवान गोलंदाज मार्क वूड आणि अष्टपैलू क्रिस वोक्स यांनाही तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. पाचवी कसोटी गुरुवारपासून सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-१ अशी आघाडी कायम राखली आहे. त्यामुळे ॲशेस त्यांच्याकडेच राहील, हे निश्चित झाले आहे.