अयाज मेमन
कन्सल्टिंग एडिटर
ब्रिजटाऊन : भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० विश्वचषकासाठी शनिवारी एकमेकांविरुद्ध भिडतील. दोन्ही संघ यंदा अपराजित आहेत. २०११ साली वन डे विश्वचषक जिंकल्यानंतर १३ वर्षांनी पुन्हा विश्वविजेतेपद पटकावण्याची नामी संधी भारतीय संघाला लाभली आहे. गेल्या वर्षापासून सलग तिसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने धडक मारली आहे.
रोहित शर्माचा संघ हा दुष्काळ संपवणार का, हाच प्रश्न आहे. कोहली फॉर्ममध्येच आहे, फक्त...रोहित, सूर्यकुमार आणि पंत यांची बॅट तळपली आहे. चिंता आहे ती केवळ कोहलीची. त्याचा फॉर्म हरपल्याचे दिसत नाही. कर्णधार व प्रशिक्षकाचा पूर्ण पाठिंबा आहे. जडेजाच्या फॉर्मचीही चिंता आहे. दोघेही लौकिकानुसार खेळले, तर आपल्याला रोखणे आफ्रिकेला कठीण जाईल.
दक्षिण आफ्रिकेवर दबाव
दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक अंतिम सामना खेळत आहे. त्यामुळे मोठ्या सामन्यांत सातत्याने कच खात असल्याने त्यांच्यावर लागलेला ‘चोकर्स’चा ठप्पा पुसण्याची त्यांना संधी आहे. आफ्रिका भारताप्रमाणेच स्पर्धेत अपराजित राहिला. भारतासारख्या मजबूत संघाविरुद्ध खेळताना त्यांच्यावर मोठे दडपण असेल आणि याचाच त्यांना सामना करावा लागेल. असे असले तरी, या संघाला कमी लेखता येणार नाही. दक्षिण आफ्रिकेचे अनेक खेळाडू भारताविरुद्ध कायम यशस्वी ठरतात. सलामीवीर क्विंटन डीकॉक यापैकीच एक आहे. त्याची बॅट तळपली, तर तो एकहाती संघाला मोठी धावसंख्या उभारून देऊ शकतो.
हेन्रीच क्लासेन व कर्णधार एडेन मार्करम यांचीही फटकेबाजी महत्त्वाची ठरेल. मधल्या फळीत त्यांच्याकडे डेव्हिड मिलरच्या रुपाने भक्कम फलंदाज आहे. गोलंदाजीत कागिसो रबाडा, ॲन्रीच नॉर्खिया, केशव महाराज व तबरेझ शम्सी असे दर्जेदार पर्याय आहेत.
एकावर भिस्त नाही
भारतीय संघाने सांघिक कामगिरीवर भर दिला आहे. गोलंदाजीमध्ये बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांनी छाप पाडली आहे. हार्दिकने सर्वांना चकीत केले. कुलदीपची जादुई फिरकी जवळपास प्रत्येक सामन्यात दिसून आली. अक्षर पटेलनेही आपल्या फिरकीने भारतासाठी मोलाचे योगदान दिले आहे.
रोहितचे आक्रमण
रोहित कर्णधार व सलामीवीर म्हणून प्रभावी ठरला आहे. त्याचे जबरदस्त आक्रमण पाहून प्रतिस्पर्धी संघाच्या आव्हानातली हवा निघून जात आहे. मैदानात येणाऱ्या नव्या फलंदाजांसाठी तो सोपे काम करून ठेवतोय. त्याचे कल्पक नेतृत्वही निर्णायक ठरत आहे. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अचूक बदल करत तो प्रतिस्पर्धी संघांची परीक्षा घेतोय.
Web Title: The final match of T20 World Cup will be played between India and South Africa
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.