आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये मंगळवारी (३१ ऑक्टोबर) बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने नेत्रदीपक शैलीत विजय मिळवत उपांत्य फेरीच्या आशा अबाधित ठेवल्या.
पाकिस्तान आणि बांगलादेशचा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला. मात्र या सामन्यादरम्यान ३ ते ४ मुलं पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवताना दिसली. ते पॅलेस्टाईन जिंदाबादच्या घोषणाही देताना दिसले. त्यामुळे या प्रकरणानंतर वाद अधिकच वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ईडन गार्डनच्या G1 आणि H1 या ब्लॉकमध्ये घडली आहे. बांगलादेशच्या डावादरम्यान काही प्रेक्षकांना काही लोकांनी पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवल्याचे दिसले. त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, पाकिस्ताननेवन डे वर्ल्ड कप स्पर्धेत तिसऱ्या विजयाची नोंद करताना आव्हान कायम राखले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्यांनी दणदणीत विजय मिळवून नेट रन रेटची चांगलाच सुधारला आणि याचा फायदा त्यांना उपांत्य फेरीचे गणित सोडवण्यासाठी होणार आहे. पाकिस्तान आता ६ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आला आहे आणि त्यांना उर्वरित दोन लढतीत न्यूझीलंड ( ४ नोव्हेंबर) व इंग्लंड ( ११ नोव्हेंबर) यांच्याविरुद्ध खेळायचे आहे. हे दोन्ही सामने त्यांना जिंकावे लागतीलच, शिवाय अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागेल.