ब्रिस्टॉल : इंग्लंडचा स्टार फलंदाज जॉनी बेयरस्टोला आपला संघसहकारी अष्टपैलू सॅम कुरेनला मस्तीमस्तीमध्ये खांद्यावर उचलणे महागात पडले आहे. कारण, या मस्तीमध्ये बेयरस्टोला दुखापत झाली असून, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यातील त्याच्या सहभागावर प्रश्न निर्माण झाले आहेत.
या दुखापतीमुळे बेयरस्टोला सराव सत्र अर्धवट सोडावे लागले. त्याच्या डाव्या गुडघ्यावर पट्टीही बांधली होती आणि चालताना त्याला वेदना होत होत्या. मात्र, तरी अद्याप त्याच्या पहिल्या टी-२० सामन्यातील सहभागाविषयी अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांना सलग दोन दिवस टी-२० सामने खेळायचे आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत बेयरस्टोला पहिल्या सामन्यात संघाबाहेर बसावे लागू शकते. जर बेयरस्टो संघाबाहेर गेला, तर मधल्या फळीत फिल सॉल्ट किंवा हॅरी ब्रूक यांचे स्थान कायम राहील. दोघेही बेयरस्टोच्या अनुपस्थितीत भारताविरुद्धच्या मालिकेत खेळले होते.