नवी दिल्ली : टी-२० प्रकारात पॉवर प्लेमधील षटकात गडी बाद करणारा आणि धावा रोखणारा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार डेथ ओव्हरमध्ये (विशेषत: १९ व्या षटकात) व्हिलन ठरत असल्याने हातातोंडाशी आलेला विजय प्रतिस्पर्धी संघाला बहाल करण्याची भारतावर नामुष्की ओढवत आहे. मोहालीत मंगळवारी २०८ धावांचे संरक्षण करताना भारतीय गोलंदाजांनी लाजिरवाणी कामगिरी केली. भुवनेश्वरने चार षटकांत ५२ धावा दिल्या. त्याला एकही बळी घेता आला नाही. युझवेंद्र चहलच्या बाबतीतही तसेच झाले, चहलने केवळ ३.२ षटकांत ४२ धावा मोजल्या, तर प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या हर्षल पटेलने चार षटकांत ४९ धावा दिल्या.
पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या तोंडावर भुवीचे डेथ ओव्हरमधील अपयश भारतासाठी चिंतेची बाब असल्याचे मत दिग्गज सुनील गावसकर यांनी बुधवारी व्यक्त केले. एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना गावसकर म्हणाले, ‘मोहालीच्या मैदानावर दव असल्याचे जाणवले नाही. भारताच्या क्षेत्ररक्षकांनी किंवा गोलंदाजांनी हात कोरडे करण्यासाठी रुमालाचा वापर केला नाही. पराभवासाठी कुठलाही बहाणा नको. भारताने चांगली गोलंदाजी केली नाही.’
‘भुवनेश्वर टीम इंडियाचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. भुवी नवीन चेंडूने स्विंगची जादू दाखवतो. मात्र, गेल्या काही सामन्यांमध्ये तो डेथ ओव्हर्समध्ये चांगलाच महागडा ठरला आहे. भुवनेश्वर स्लॉग ओव्हर्समध्ये ऑफ-साइड वाइड लाइन यॉर्कर्सवर अवलंबून असतो; परंतु आशिया चषकात त्याच्या या चाली फोल ठरल्या. पाकिस्तान, श्रीलंका आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ व्या षटकात १८ चेंडूंत ४९ धावा दिल्या. त्याच्यासारखा अनुभवी आणि क्षमतावान गोलंदाज प्रतिचेंडू सरासरी तीन धावा मोजत असेल तर हा चिंतेचा विषय ठरतो. मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही बचाव करण्यात अपयश का यावे,’ असा प्रश्न गावसकर यांनी उपस्थित केला. जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनामुळे गोलंदाजी बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त करीत गावसकर पुढे म्हणाले, ‘बुमराह सुरुवातीला लवकर गडी बाद करीत असल्याने तो परत येईल तेव्हा परिस्थिती सुधारू शकते. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया विश्वविजेता असल्याने या संघाकडून अभूतपूर्व कामगिरीची अपेक्षा असते. लौकिकानुसार त्यांनी वेगाने धावा काढल्या.’