deepti sharma team in the hundred 2024 : भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू दीप्ती शर्मा तिच्या अष्टपैलू खेळीसाठी प्रसिद्ध आहे. सध्या महिलांच्या द हंड्रेड स्पर्धेचा थरार रंगला आहे. या स्पर्धेतील २९व्या सामन्यात लंडन स्पिरिट आणि नॉर्दर्न सुपरचार्जर्स हे संघ भिडले. लंडनच्या संघाने ७ विकेट राखून शानदार विजय साकारला. या विजयापेक्षा भारतीय खेळाडू दीप्ती शर्माची फलंदाजी सर्वांचे लक्ष वेधून गेली. लंडनच्या संघाच्या विजयात दीप्तीने मोठे योगदान दिले. दीप्ती शर्माने ३१ चेंडूत ३७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तत्पुर्वी, तिने गोलंदाजी करताना अवघ्या १९ धावा देत एक बळी घेतला. अष्टपैलू खेळी करणाऱ्या दीप्तीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
फलंदाजी करताना भारताच्या दीप्तीने ऑस्ट्रेलियाची स्टार अष्टपैलू खेळाडू एनाबेल सदरलँडच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार लगावला. दीप्तीचा हा षटकार चाहत्यांना सिक्सर किंग युवराज सिंगची आठवण देऊन गेला. युवराजच्या शैलीत दीप्तीने मारलेला षटकार साऱ्यांचे लक्ष वेधत आहे.
नॉर्दर्न सुपरचार्जर्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १०० चेंडूत ७ विकेट गमावून अवघ्या ९९ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दीप्तीने किल्ला लढवला. सुपरचार्जर्सकडून डेव्हिडसन रिचर्ड्सने सर्वाधिक ३३ धावा केल्या होत्या. तिच्याशिवाय एनाबेल सदरलँडने १७ चेंडूत २४ धावांची साजेशी खेळी केली. अन्य खेळाडूंची साथ न लाभल्याने त्यांना १०० चा आकडा गाठता आला नाही.
१०० धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना लंडन स्पिरिटने सहज विजय साकारला. दीप्ती शर्माच्या अप्रतिम खेळीने संघाला विजय मिळवून दिला. त्यांनी ३ विकेट गमावून ८६ चेंडूत लक्ष्य गाठले. कर्णधार हीदर नाइटने नाबाद ४३ तर दीप्तीने नाबाद ३७ धावा कुटल्या.