आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थात आयसीसीने आपल्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार आता टीव्ही अम्पायर स्टम्पिंग अपीलवर झेल होता का नाही, हे पाहू शकणार नाही. हा बदल १२ डिसेंबर २०२३ पासून अंमलात आला आणि आता यष्टिरक्षकाने बेल्स पाडल्यानंतर जर संघाला झेलसाठी दाद मागायची असल्यास त्यांना वेगळा DRS घ्यावा लागणार आहे.
गेल्या वर्षाच्या सुरुवातीला भारताविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरी स्टम्पिंगसाठी अपील करायचा आणि टीव्ही अम्पायर हे तपासता झेल घेतला की नाही हेही पाहायचा. असे अनेक वेळा घतल्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला DRS घ्यावा लागत नव्हता आणि अम्पायरही चेंडू बॅटला लागला आहे की नाही हे पाहत असत. मात्र, आता स्टम्पिंगच्या DRS नंतर टीव्ही अम्पायर बॅट्समन स्टम्पिंग आऊट झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी फक्त साइड ऑन कॅमेरा वापरेल.
आयसीसीने कंसशन नियमांमध्येही स्पष्टता दिली आहे. एखाद्या खेळाडूला गोलंदाजी करण्यापासून रोखल्यास त्याच्या बदली खेळाडूलाही गोलंदाजी करण्याची परवानगी दिली जाणार नाही. आयसीसीने मैदानावरील दुखापतींची तपासणी किंवा उपचारासाठीचा कालावधीही ४ मिनिटांपर्यंत मर्यादित केला आहे.