मुंबई - ‘क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेचे महत्त्व असते. एका धावेमुळे तुम्ही जिंकू शकता किंवा हरू शकता. या एका धावेचे महत्त्व मला शिवाजी पार्क मैदानातील सामन्याने कळाले,’ अशी आठवण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सांगितली. बुधवारी मुंबईत झालेल्या इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (आयएसपीएल) स्पर्धेच्या कार्यक्रमादरम्यान सचिनने ही आठवण सांगितली. यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) खजिनदार आशिष शेलार आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांचीही उपस्थिती होती.
सचिनने म्हटले की, ‘मी माझ्या आयुष्यातील पहिल्या सामन्यासाठी माझ्या साहित्य सहवासामधील मित्रांना शिवाजी पार्क मैदानावर बोलावले होते. त्यावेळी मी शून्यावर बाद झालो होतो. यानंतरच्या सामन्यासाठीही मी मित्रांना बोलावले आणि त्या सामन्यातही मी शून्यावर बाद झालेलो. दोन्ही वेळेला चेंडू कशाप्रकारे खाली बसला आणि अचानक उसळला असे कारण मी मित्रांना सांगितले होते. तिसऱ्या सामन्यासाठी मात्र मी कोणालाही बोलावले नाही. त्या सामन्यातही मी लवकर बाद झालेलो, पण एक धावही काढली होती. त्यावेळी मी आनंदी होतो, कारण पाच-सहा चेंडू खेळून एक धाव काढली होती. सामन्यानंतर शिवाजी पार्कहून वांद्र्याला जाताना बस प्रवासादरम्यान मी याच गोष्टीचा विचार करत होतो आणि त्या एका धावेमुळे मी आनंदी होतो. त्या सामन्यातून मला एका धावेचे महत्त्व समजले होते.’
सचिनने यावेळी आपल्या आवडत्या स्ट्रेट ड्राईव्ह फटक्याचीही आठवण सांगितली. सचिनने म्हटले की, ‘साहित्य सहवास कॉलनीमध्ये दोन्ही बाजूला असलेल्या इमारतींमधील मोकळ्या जागेत आम्ही क्रिकेट खेळायचो. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षण नसल्याने आम्ही कायम सरळ फटके मारण्याचा प्रयत्न करायचो. चौकार-षट्कार मिळण्याची तीच एकमेव जागा होती.
शिवाजी पार्कमध्ये सराव सत्रादरम्यान आचरेकर सरही कायम मला सरळ बॅटनेच खेळण्यास सांगायचे. त्यामुळे साहित्य सहवास कॉलनीत सातत्याने खेळल्याचा फायदा मला माझ्या आवडत्या स्ट्रेट ड्राईव्हसाठी झाला.’