भारतीय क्रिकेट संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धाराने ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. दोन सराव सामन्यांत समाधानकामगिरी केल्यानंतर रोहित शर्मा अँड कंपनी खऱ्या आव्हानासाठी तयार आहे. २३ ऑक्टोबरला भारताचा पहिलाच मुकाबला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. India vs Pakistan म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच. पण, केवळ आयसीसी स्पर्धांमध्येच हा योगायोग जुळून येतो. त्यामुळे उभय संघांमध्ये द्विदेशीय मालिका होणार केव्हा, असा प्रश्न अनेकांना पडतोय आणि BCCI ने त्याचे उत्तर दिले. बीसीसीआयने २०२३-२०२७ पर्यंत भारतीय संघाच्या वेळापत्रकाची रूपरेषा आखली आहे आणि त्यात IND vs PAK मालिकेला स्थान दिले गेलेले नाही.
मोठी बातमी! टीम इंडिया पुढील वर्षी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार? BCCI कडून संकेत, १४ वर्षांनंतर दौरा
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने त्यांच्या राज्य संघटनांना पुढील ४ वर्षांच्या भारतीय संघाच्या वेळापत्रकाची नोट पाठवली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातल्या मालिकेचा निर्णय बीसीसीआय घेऊ शकत नाही, त्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे.
- भारतीय संघ २०२७ पर्यंत ३८ कसोटी ( २० घरी व १८ बाहेर) खेळणार आहेत
- ४२ वन डे ( २१ घरी व २१ बाहेर) आणि ६१ ट्वेंटी-२० ( ३१ घरी व ३० बाहेर) सामन्यांचाही समावेश आहे
मागील कार्यक्रमात भारताने द्विदेशीय मालिकेत एकूण १६३ सामने खेळले होते, परंतू २०२३-२७ मध्ये ती संख्या १४१ अशी कमी केली गेली आहे. आयसीसीच्या स्पर्धा असल्यामुळे आणि इंडियन प्रीमिअर लीगचा कार्यकाळ वाढल्यामुळे ही संख्या घटली आहे. बीसीसीआयने चांगल्या संघांविरुद्ध मालिका खेळण्यावर भर दिली आहे. यात इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी, वन डे व ट्वेंटी-२० मालिका खेळण्यावर भर आहे. भारतीय संघ इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध होम व अवे ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. याशिवाय भारतीय संघ या संघांविरुद्ध ३ वन डे व ५ ट्वेंटी-२० सामन्यांच्या होम-अवे मालिकाही खेळणार आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"