इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठीच्या लिलावाच्या तोंडावर मोठी बातमी समोर येत आहे. पुढल्या वर्षी भारतात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर IPL 2024 भारतात होणार की नाही, याबाबत चर्चा सुरू आहे. त्यात आयपीएलच्या तारखाही निवडणुकींच्या तारखांवर अवलंबून असणार आहे. पुढल्या वर्षी ४ जून पासून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार असल्याने आयपीएलला नेमकी कोणती विंडो मिळते याची उत्सुकता होती आणि आज अखेर त्या तारखा समोर आल्या आहेत.
आयपीएल २०२४ भारतात आयोजित करण्याची शक्यता खूप जास्त आहे कारण बीसीसीआयकडे स्पर्धेसाठी शहरांची निवड करण्यासाठी पुरेसा वेळ असेल. आयपीएल २०२४ भारतात आयोजित केले गेले नाही, तर BCCI कडे दक्षिण आफ्रिका आणि UAE हा पर्याय आहे. सार्वत्रिक निवडणुकांमुळे IPL २००९ संपूर्णपणे दक्षिण आफ्रिकेत पार पडली. निवडणुकांमुळे IPL २०१४ चा हंगाम अंशतः UAE मध्ये आयोजित करण्यात आला होता. यूएईमध्ये जवळपास २० ते २५ सामने खेळले गेले. तसेच, २०२० मध्ये कोरोनामुळे IPL संपूर्णपणे UAE मध्ये आयोजित करण्यात आले होते.
बीसीसीआयची आज दुबईत बैठक पार पडली आणि त्यात २२ मार्च ते मे अखेरपर्यंत आयपीएल खेळवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होईपर्यंत आयपीएलच्या अंतिम तारखा जाहीर करण्यात येणार नाही. आयपीएल २०२४ च्या संपूर्ण लीगसाठी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, न्यूझीलंड व वेस्ट इंडिजचे सर्व खेळाडू उपलब्ध असणार आहेत. दरम्यान, इंग्लंड, आयर्लंड, श्रीलंका व बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही त्यांच्या खेळाडूंना सशर्त परवानगी दिली आहे.
जोश हेझलवूड वगळता ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडू आयपीएलच्या पूर्ण हंगामासाठी उपलब्ध असतील. हेझलवूडच्या घरी पाळणा हलणार असल्याने तो आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात खेळणार नाही. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) ने म्हटले आहे की त्यांचे खेळाडू आंतरराष्ट्रीय कर्तव्ये नसल्यास लीगमध्ये सहभागी होऊ शकतात. इंग्लिश खेळाडूंची उपलब्धता ECB च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या अधीन आहे, ज्याला अद्याप अंतिम स्वरूप दिले गेले नाही. रेहान अहमदने लिलावातून माघार घेतली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप ४ ते ३० जून दरम्यान कॅरिबियन आणि यूएसमध्ये आहे.
३० मार्च ते ३ एप्रिल दरम्यान श्रीलंकेची बांगलादेशविरुद्ध दुसरी (आणि शेवटची) कसोटी नियोजित आहे, ज्यामुळे काही श्रीलंकेच्या खेळाडूंच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तथापि, महेश थेक्षाना, वानिंदू हसरंगा, मथीशा पाथिराना आणि दुष्मंथा चमीरा हे आयपीएलच्या संपूर्ण कालावधीसाठी उपलब्ध असतील, कारण ते कसोटी फॉरमॅटमध्ये भाग घेत नाहीत.
Web Title: The Indian Premier League (IPL) 2024 window is reportedly set for March 22 - May end, SA, WI and NZ confirm full participation; limited availability of English players
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.