अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ विखुरलेला वाटतो. विशाखापट्टणममध्ये विजय मिळवून मालिकेत १-१ अशी बरोबरी जरूर केली; पण दुसरी कसोटी गमावूनदेखील इंग्लंडची कामगिरी वाखाणण्यासारखीच होती. बॅझबॉल रणनीतीनुसार इंग्लंड पुन्हा चवताळून कामगिरी करण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहे.
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताचा फलंदाजी क्रम काहीसा कमकुवत वाटतो. लोकेश राहुलचे पुनरागमन होत असले, तरी मोहम्मद शमीचे संघात नसणे आणि कर्णधार रोहित शर्माची साधारण कामगिरी यामुळे संघाच्या चिंतेत भर पडली. दुसरीकडे यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी मात्र दमदार कामगिरी करीत धावा काढल्या. तरीही संघाचा एकूण फलंदाजी क्रम काहीसा कमकुवत वाटतोच.
बुमराह ‘मॅचविनर’भारतीय गोलंदाजीची सर्व भिस्त वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर आहे. बुमराह संघाचा मॅचविनर ठरतो. त्याला बाहेर करता येणार नाही, हे ध्यानात ठेवून निवडकर्त्यांनी त्याला संघात कायम ठेवले. आता त्याचा योग्य पद्धतीने वापर व्हायला हवा. शमीचे पुनरागमन झाल्यानंतरही बुमराहला विश्रांती देता येणार नाही. दोघांमधील समन्वय संघासाठी फार लाभदायी ठरू शकेल. रोहितच्या नेतृत्वावर जुगाररोहितसाठी हा काळ आव्हानात्मक असाच आहे. भारतीय कर्णधाराला फलंदाज या नात्याने कुठल्याही परिस्थितीत लयीत परतावे लागणार आहे. तीन कसोटी सामन्यांत तो लौकिकानुसार खेळल्यास इंग्लंड संघापुढे मोठे आव्हान उभे राहील. असे न करू शकल्यास मात्र रोहितच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह लागू शकेल.
अक्षरचे स्थान धोक्यातरवींद्र जडेजाच्या पुनरागमनामुळे अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यासह संघात डावखुरे तीन फिरकी गोलंदाज झाले आहेत. ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन हा चौथा फिरकी गोलंदाज असेल. अशावेळी राजकोटच्या खेळपट्टीवर अक्षर पटेल याला तिसऱ्या कसोटीदरम्यान ब्रेक मिळण्याची शक्यता आहे.
रूटमुळे अडचणीत भरइंग्लंड संघ सध्या अबुधाबीत सराव करीत आहे. माजी कर्णधार ज्यो रूट हा संघासाठी डोकेदुखी ठरताना दिसतोय. या संघात बेन स्टोक्ससह ज्यो रूट हादेखील दिग्गज फलंदाज मानला जातो; पण भारतीय फिरकी गोलंदाज त्याला सतत जाळ्यात ओढत आहेत. याचे खरे कारण बॅझबॉल शैली आहे. बॅझबॉल तंत्र रूटच्या स्वाभाविक खेळाविरुद्ध जात आहे.
१९ वर्षांखालील विश्वचषक फायनल : भविष्याची आशादक्षिण आफ्रिकेच्या यजमानपदाखाली आयोजित १९ वर्षांखालील युवा वनडे आयसीसी विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी भारत वि. ऑस्ट्रेलिया असा खेळला जाईल. कनिष्ठ स्तरावर उभय देशांमध्ये क्रिकेटपटूंची मोठी फळी आहे. याच खेळाडूंमधून येणारे प्रतिभावान खेळाडू पुढे राष्ट्रीय संघांना बलाढ्य बनवितात. १९ वर्षांखालील विश्वचषकात कामगिरीची अमिट छाप सोडणाऱ्या अनेक भारतीय खेळाडूंनी पुढे राष्ट्रीय संघातून शानदार कामगिरी केली. त्यात विराट कोहली, युवराजसिंग, रवींद्र जडेजा, मोहम्मद कैफ, अजिंक्य रहाणे आदी दिग्गजांचा समावेश होतो.