- मतीन खान
(स्पोर्ट्स हेड -सहायक उपाध्यक्ष लोकमत पत्रसमूह)
टीम इंडियाचा टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात दारुण पराभव झाला असेल, पण क्रिकेट आम्हा भारतीयांच्या रक्तप्रवाहात आहे. पराभवाचे वाईट वाटले, वेदना झाल्या, अश्रूही तरळले, आमच्यापैकी अनेकांनी आपल्याच खेळाडूंना शिव्यांची लाखोली वाहिली; पण त्यामुळे क्रिकेटवरील आमचे प्रेम कमी होईल, असे मुळीच नाही. क्रिकेटवेड कायम राहणारच आहे, पण गरज असेल ती स्वत:ला सावरण्याची, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची! टीम इंडिया २०२४ ला कसा विश्व चॅम्पियन होऊ शकेल, याची चर्चा करूया...
नवा कर्णधार, नवा विचार
पुढचा टी-२० विश्वचषक २०२४ ला वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळला जाईल. यासाठी तयारीचा भाग म्हणून सर्वांत आधी नेतृत्व परिवर्तन व्हायला हवे. हार्दिक पांड्याने सध्याच्या विश्वचषकात अष्टपैलू कामगिरीद्वारे सर्वांना प्रभावित केले. त्यामुळे जानेवारी २०२३ ला टी-२० संघाची सूत्रे त्याच्याकडे येण्याची शक्यता आहे. या चढाओढीत राहुल आणि ऋषभ पंत देखील होते, मात्र आता हार्दिक सर्वांत पुढे आहे.
वेगवान गोलंदाज, प्रभावी फिरकीपटू
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत आमचा मारा बोथट जाणवला. अर्शदीपने प्रयत्न केले; पण यापुढे उमरान मलिक, मोहसीन, आवेश खान किंवा चेतन सकारिया यांच्यासारख्यांना अधिक भेदक बनविण्याकडे लक्ष द्यावे लागेल. रवी बिश्नोई, शाहबाज अहमद, राहुल चाहर या धावा रोखणाऱ्या फिरकी गोलंदाजांकडे लक्ष वळवावे लागेल.
धोनीसारखी मानसिकता हवी
कोणत्याही स्थितीत विजय मिळवायचाच, ही मानसिकता रुजविण्यात राहुल द्रविड अपयशी ठरला. टीम इंडियाला आता धोनीसारख्या कोचची गरज आहे, असा कोच जो निडर होऊन खेळण्यास प्रोत्साहन देईल, प्रेरित करेल.
अष्टपैलूंची गरज
विश्वचषक विजेत्या इंग्लंड संघात सात अष्टपैलू खेळाडू होते. बेन स्टोक्स, सॅम कुरेन, क्रिस वोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, क्रिस जॉर्डन आणि आदिल राशीद. या तुलनेत आमच्याकडे हार्दिक, आश्विन आणि अक्षर पटेल यांच्याशिवाय कोणताही उच्च दर्जाचा अष्टपैलू नव्हता. भविष्यात मात्र दीपक हुड्डा, व्यंकटेश अय्यर, राहुल तेवतिया आणि दीपक चाहर सारख्यांना पुढे आणावेच लागेल. हे सर्वजण चेंडू आणि बॅट या दोहोंमध्ये बलस्थानांचा वापर करीत सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता बाळगतात.
यांचे मार्ग झाले बंद
रोहित शर्मा, लोकेश राहुल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार यांच्यासाठी टी-२० संघात कायम असणे ओझ्यापेक्षा कमी नसेल. या खेळाडूंनी आता टी-२० चा नाद सोडून वन डे किंवा कसोटीवरच लक्ष केंद्रित केलेले बरे. विश्वचषक जिंकण्याची प्रतीक्षा संपविण्यासाठी यापुढे काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे अपेक्षा करूया की, ‘इक न इक शमा अंधेरे में जलाए रखिए, सुबह होने को है माहौल बनाए रखिए!’
Web Title: The Indian team needs to recover itself, go from darkness to light!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.