ईस्ट लंडन : फलंदाजांनी निर्णायक सामन्यात कच खाल्ल्याने भारतील महिला संघाला त्रिकोणीय टी-२० मालिकेच्या अंतिम सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ बळींनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीयांना २० षटकांत ४ बाद १०९ धावाच काढता आल्या. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने १८ षटकांमध्येच पार करताना ५ बाद ११३ धावा केल्या.
च्लोइ ट्रायोन हिने ३२ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ५७ धावांचा तडाखा देत दक्षिण आफ्रिकेचा विजय साकारला. प्रमुख फलंदाजांना स्वस्तात बाद करत भारतीय गोलंदाजांनी सामन्यात चुरस निर्माण केली होती. यजमानांचा अर्धा संघ ६६ धावांमध्ये बाद करत भारताने शानदार पुनरागमन केले होते. मात्र, ट्रायोनने नदिने डी क्लर्कसोबत सहाव्या बळीसाठी नाबाद ४७ धावांची भागीदारी केली. क्लर्कने १७ चेंडूंत एका चौकारासह नाबाद १७ धावा केल्या. स्नेह राणाने (२/२१) भारताकडून चांगली गोलंदाजी केली.
त्याआधी, नोनकुलुलेको एमलाबा हिने दोन महत्त्वपूर्ण बळी घेत यजमानांना पकड मिळवून दिली. हरलीन देओलने ५६ चेंडूंत ४ चौकारांसह ४६ धावांची एकाकी झुंज दिली. स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारताची सातव्या षटकामध्ये २ बाद २१ धावा अशी अवस्था झाली. हरलीन देओल आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी तिसऱ्या बळीसाठी ४८ चेंडूंत ४८ धावांची भागीदारी केली. मात्र, त्यांना अपेक्षित धावगती राखता आली नाही.
हरमनप्रीत आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाल्यानंतर हरलीनने सर्व सूत्रे सांभाळली. दक्षिण आफ्रिकेने सातत्याने अचूक टप्प्यावर मारा करत भारतीयांना जखडवले. दीप्ती शर्माच्या (१४ चेंडूंत नाबाद १६ धावा) छोटेखानी आक्रमक खेळीमुळे भारताने शतकी मजल मारली.
संक्षिप्त धावफलक :
भारत : २० षटकांत ४ बाद १०९ धावा. (हरलीन देओल ४६, हरमनप्रीत कौर २१, जेमिमा रॉड्रिग्ज ११; नोनकुलुलेको एमलबा २/१६, अयाबोंगा खाका १/१७, सुन लुस १/२२) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका : १८ षटकांत ५ बाद ११३ धावा (च्लोइ ट्रायोन नाबाद ५७, नदिने डी क्लर्क नाबाद १७; स्नेह राणा २/२१, रेणुका सिंग १/१६, दीप्ती शर्मा १/१९, राजेश्वरी गायकवाड १/२५)
Web Title: The Indian women's team lost the title in hand, beating South Africa in the tri-series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.