नवी दिल्ली : आयपीएल २०२२ चे आयोजन मुंबईत होईल. बीसीसीआयच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत यावर शिक्कमोर्तब झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वृत्तानुसार मुंबईत एकापेक्षा अधिक स्टेडियम्स उपलब्ध आहेत. शिवाय अन्य सुविधा असल्यामुळे एकाच शहरात आयपीएल सामने घेण्याविषयी एकमत झाले. याबाबत अधिकृत घोषणा मात्र २० फेब्रुवारी रोजी होईल. याआधी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी आयपीएल आयोजन भारतात घेण्याचा मानस बोलून दाखविला होता. १५ वे सत्र मार्चअखेर सुरू होईल आणि मेच्या अखेरच्या आठवड्यात लीगची सांगता होईल, असे त्यांनी सांगितले होते.
आयपीएल २०२१ चे आयोजन अहमदाबाद, बंगळुरू, दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता, अशा सहा शहरात झाले होते. खेळाडू कोरोनाबाधित होताच अर्ध्यात स्पर्धा स्थगित करण्यात आली. नंतर दुसरा टप्पा मात्र सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये यूएईत खेळविण्यात आला होता. यंदा अशी चूक पुन्हा करायची नाही, असा बोर्डाने बोध घेतलेला दिसतो.
मुंबईतच आयोजन का?
मुंबईत वानखेडे स्टेडियम, सीसीआयचे ब्रेबॉर्न स्टेडियम आणि नवी मुंबईत डी.वाय. पाटील स्टेडियम आहेत. अधिक गरज भासल्यास अडीच तासांच्या अंतरावर पुण्यातील गहुंजे स्टेडियम आहेच. अशावेळी खेळाडूंना विमान प्रवास करावा लागणार नाही. यामुळे कोरोनाची भीती राहणार नाही. मुंबईत सर्व दहा संघांचे खेळाडू वास्तव्य करू शकतील इतकी पंचतारांकित हॉटेल्स आहेत. या हाॅटेल्समध्ये सहजपणे बायोबबल स्थापन करता येऊ शकतील.
Web Title: The IPL will be held in Mumbai this year and the official announcement will be made on February 20
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.