lowest score in the history of T20 : आयल ऑफ मॅन संघाने ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वात लाजिरवाणा विक्रम नावावर नोंदवला. कार्ल हार्टमनच्या नेतृत्वाखालील आयल ऑफ मॅन संघ स्पेनविरुद्ध ८.४ षटकांत १० धावांवर बाद झाला आणि ट्वेंटी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येवर बाद होणारा संघ ठरला. बिग बॅश लीग (BBL) च्या २०२२-२३ आवृत्तीत अॅडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध १५ धावा करणाऱ्या सिडनी थंडरलाही मागे टाकले आहे. आयल ऑफ मॅन संघाचे सात फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाहीत.
जोसेफ बरोजने सात चेंडूत चार धावा करत सर्वाधिक धावा केल्या. स्पॅनिश गोलंदाज आतिफ महमूदने ४-२-६-४ असे गुण पूर्ण केले. मोहम्मद कामरान आणि लॉर्न बर्न्स यांनी अनुक्रमे तीन आणि दोन विकेट घेतल्या. आयल ऑफ मॅनने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० च्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्याही नोंदवली. त्यांनी २०१९ मध्ये इल्फोव्ह कौंटीमध्ये झेक प्रजासत्ताक विरुद्ध २१ धावांवर बाद झालेल्या तुर्कीचा चार वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
आयल ऑफ मॅनचा यापूर्वीचा सर्वात कमी स्कोअर ६६ हा २५ फेब्रुवारी रोजी स्पेनविरुद्ध होता. आयल ऑफ मॅनने आतापर्यंत १६ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत, त्यापैकी आठ जिंकले आहेत आणि सात गमावले आहेत. एक सामन्याचा निकाल लागला नाही. आयल ऑफ मॅनने स्पेनविरुद्धची सहा सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका ०-५ अशी गमावली. त्यांनी या मालिकेतला पहिला सामना ८१ धावांनी गमावला, दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. स्पेनने तिसरा आणि चौथा सामना अनुक्रमे आठ आणि सहा गडी राखून जिंकला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"