नवी दिल्ली: आयपीएलचे १५ वे पर्व सुरू होण्यास केवळ ११ दिवस शिल्लक आहेत. २०२२ चा पहिला सामना २६ मार्च रोजी चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. बीसीसीआयने कोरोना स्थिती लक्षात घेत सध्याचे नियम बदलले आहेत. यंदाच्या पर्वासाठी जाहीर झालेल्या नव्या नियमांमध्ये नव्याने येणारा फलंदाज स्ट्राईक घेण्यापासून तर डीआरएस प्रणाली पर्यंतच्या बदलाचा समावेश आहे.
बदललेले नियम असे
टाय झाल्यानंतर काय?
१. प्लेऑफ किंवा अंतिम सामना ‘टाय’ झाल्यानंतर, सुपर ओव्हर किंवा त्यानंतर सुपर ओव्हरने कोणताही निर्णय न झाल्यास लीग टप्प्यातील खेळ पाहिला जाईल. जो संघ लीग टप्प्यात अव्वल असेल तो विजेता मानला जाईल. याचाच अर्थ आता सर्व संघांसमोर हे आव्हान असेल की, प्लेऑफमध्ये पात्र ठरण्याबरोबरच त्या संघाला साखळीतही अव्वल स्थान मिळवावे लागेल.
२. जर संघ प्लेइंग इलेव्हन तयार करू शकला नाही तर, तो सामना नंतर पुन्हा शेड्यूल केला जाईल. त्यानंतरही सामना झाला नाही तर, हे प्रकरण तांत्रिक समितीकडे पाठवले जाईल.
३. दुसरा सर्वात महत्त्वाचा बदल डीआरएसबाबत आहे. नव्या नियमानुसार प्रत्येक डावातील डीआरएसची संख्या एक वरून दोन करण्यात आली आहे.
४. फलंदाजासाठी स्ट्राईट रोटेशन
एखादा फलंदाज झेल बाद होत असताना क्रिझच्या मध्यभागी असला तरीही नवीन फलंदाजाने स्ट्राइकवर यावे. याशिवाय चेंडूवर थुंकीचा वापर करता येणार नाही. वाईड बॉलसंबंधी नियम देखील बदलण्यात आला आहे.
५. माकंडिंग...
आता आयपीएलमध्ये मांकडिंग हे धावबाद मानले जाईल. नॉन स्ट्राईकला उभा असलेला फलंदाज चेंडू पडण्याआधीच क्रिझ सोडत असेल तर, गोलंदाज त्याला बाद करू शकतो. एमसीसीने अलीकडे या नियमाला मान्यता दिली होती. याआधी मांकडिंग हे अवैध मानले जायचे.