The New Rules in IPL 2024: इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये नवीन नियम आणण्यात आले आहेत. मागील पर्वात एका षटकात गोलंदाजाला एकच बाऊन्सर टाकता येत होता, परंतु आता बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे दोन बाऊन्सरची परवानगी दिली होती, तोच नियम आयपीएल २०२४ मध्ये दिसणार आहे. बीसीसीआयने यंदाच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत दोन बाऊन्सरचा नियम आणला होता.
पण, आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त आयसीसीने एका षटकात एक शॉर्ट बॉल टाकण्यास परवानगी दिलेली आहे, परंतु त्याचवेळी कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये दोन बाऊन्सरचा नियम आहे. ''हा चांगला पुढाकार घेतला आहे,''असे लक्ष्मीपती बालाजी म्हणाला. "या नियमामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळणार आहे आणइ गोलंदाज, कर्णधार व सपोर्ट स्टाफला रणनीती बनवण्यासाठी व विशिष्ट फलंदाजाला बाद करण्यासाठी मदत प्रदान करेल. यामुळे बॅट आणि बॉलमधील स्पर्धा अधिक संतुलित होईल," असेही तो म्हणाला.
आणखी एक उल्लेखनीय नियम म्हणजे, बीसीसीआयने स्टम्पिंगसाठी रेफरल असताना झेल तपासण्याचा नियम कायम ठेवला आहे. "अशी परिस्थिती असू शकते की स्टम्पिंगची तपासणी करताना बॅटने चेंडूला स्पर्श केल्याचे दिसून येईल. आयसीसीच्या नियमानुसार, तिसरा पंच स्टम्पिंगची अपील असताना फलंदाजाला झेलबाद देऊ शकत नाही. ते अन्यायकारक ठरेल. त्यामुळे बीसीसीआयने जूना नियमावर टिकून राहण्याचे ठरवले आहे,"असे बोर्डाच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
त्याशिवाय गतवर्षी प्रमाणे एक संघ दोन रेफरल्स घेऊ शकतात आणि त्यांना वाईड व नो बॉलसाठीही दाद मागता येणआर आहे. पण, आयसीसीने नुकताच जाहीर केलेला स्टॉप क्लॉकचा नियम यंदाच्या आयपीएलमध्ये दिसणार नाही.