Join us  

वानखेडेतील पुतळा उभारण्याचे वृत्त आश्चर्यजनक, सचिन तेंडुलकरची पहिली प्रतिक्रिया

सचिनचा पुतळा वानखेडे स्टेडियमध्ये उभारण्यात येत असल्याचं वृत्त सचिन तेंडुलकरसाठीही आश्चर्यकारकच होतं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 3:50 PM

Open in App

मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये मास्टरब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरचा मोठा पुतळा बसवण्यात येणार आहे. याच मैदानावर सचिनने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. क्रिकेट अधिकार्‍यांच्या मते, या पुतळ्याचे अनावरण २४ एप्रिल, सचिन तेंडुलकरच्या पन्नासाव्या वाढदिवसादिवशी किंवा या वर्षीच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान केले जाऊ शकते. एप्रिलमध्ये पुतळ्याचे अनावरण केल्यास मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना आयपीएल २०२३ दरम्यान  तो पाहता येईल. सचिन तेंडुलकरने या पुतळ्याच्या वृत्तावर आपली प्रतिक्रिया देताना हा सुखद धक्का असल्याचं म्हटलंय. 

सचिनचा पुतळा वानखेडे स्टेडियमध्ये उभारण्यात येत असल्याचं वृत्त सचिन तेंडुलकरसाठीही आश्चर्यकारकच होतं. कारण, हा माझ्यासाठी सुखद धक्का असल्याचं सचिनने म्हटलं. याच वानखेडे मैदानावरुन मी माझ्या क्रिकेट करिअरची सुरुवात केली. कधीच विसरता येणार नाहीत, अशा आठवणी येथे आहेत. भारतीय संघाने २०११ मध्ये जेव्हा विश्वचषक जिंकला, तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी क्षण होता, तोही क्षण याच वानखेडे मैदानावर साजरा झाल्याचे सचिनने म्हटले. 

सचिनने मीडियाशी बोलताना गुरू रमाकांत आचरेकर यांचेही नाव घेतले, त्यांनी मला याच स्टेडियममध्ये क्रिकटचे धडे दिले. त्यातून, क्रिकेटबद्दल मला प्रचंड आवड निर्माण झाली. आज, याच मैदानावर माझा स्टॅच्यू बसवण्यात येणार आहे, ही बाब माझ्यासाठी खूप मोठी आहे, असेही सचिनने स्पष्ट केले.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना या घोषणेची पुष्टी केली होती. वानखेडे स्टेडियमवर हा पहिलाच पुतळा असेल, तो कुठे ठेवायचा हे आम्ही ठरवू, असेही ते म्हणाले. तेंडुलकर भारतरत्न आहेत आणि त्यांनी क्रिकेटसाठी काय केले हे सर्वांना माहीत आहे. त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवशी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून  एक लहान भेट म्हणून हा पुतळा उभारण्यात येईल. मी तीन आठवड्यांपूर्वी त्यांच्याशी बोललो आणि त्यांची संमती घेतली.", असेही काळे यांनी म्हटले.

सचिनचे क्रिकेट करिअर

सचिन तेंडुलकरने भारताकडून २०० कसोटी सामने, ४६३ वन डे आणि १ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनने सर्वाधिक ३४,३५७ धावा आणि १०० शतके  झळकावली आहेत. वानखेडे स्टेडियमवर याआधी तेंडुलकरचे नाव स्टँडला दिले गेले आहे. एमसीएने गेल्या हंगामात सुनील गावस्कर यांच्या स्मरणार्थ कॉर्पोरेट बॉक्स आणि दिलीप वेंगसरकर यांच्या सन्मानार्थ स्टँड समर्पित करण्याचा निर्णय घेतला.

आत्तापर्यंत देशातील स्टेडियममध्ये पुतळे

देशभरातील स्टेडियममध्ये क्रिकेटपटूंचे फारसे पुतळे नाहीत. इंदूरमधील होळकर स्टेडियम, आंध्र प्रदेशमधील व्हीडीसीए स्टेडियम आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम येथे माजी भारतीय महान सीके नायडू यांचे तीन वेगवेगळे पुतळे आहेत. 

टॅग्स :सचिन तेंडुलकरमुंबईभारतीय क्रिकेट संघ
Open in App