इंदूर : ऑस्ट्रेलियाविरुद्धकडून तिसऱ्या कसोटीत भारत नऊ गड्यांनी पराभूत झाला. या दारुण कामगिरीवर माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी भारतीय फलंदाजांवर सडकून टीका केली.
गावसकर म्हणाले, ‘खेळपट्टीने फलंदाजांच्या मनावर वर्चस्व गाजविले. पहिल्या चेंडूपासून फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय संघाला दोन्ही डावांत केवळ १०९ आणि १६३ धावा करता आल्या. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या दिवशीच विजय साजरा करता आला. फलंदाजांनी स्वत:च्या प्रतिभेला न्याय दिला नाही. भारतीय फलंदाज कसे बाद झाले, यावर कटाक्ष टाकल्यास लक्षात येईल की भारतीय फलंदाजांनी स्वत:च्या चुकांमुळे खड्डे खोदले.
अनेक जण असे काही फटके खेळत होते, की खेळपट्टीवरून चेंडू कसा येईल याचा अंदाज त्यांना आधीच आला असावा.’ भारतीय खेळाडूंमध्ये आत्मविश्वासाचा अभाव जाणवल्याचे नमूद करीत गावसकर पुढे म्हणाले, ‘रोहित शर्मा, जडेजा आणि अक्षर यांच्याशिवाय पहिल्या दोन सामन्यांमध्ये धावा केल्या नाहीत. रोहितने नागपुरात शानदार शतक झळकावले होते. जेव्हा तुमच्या खात्यात कमी धावा असतात, तेव्हा फलंदाजीत काहीशी अस्थिरता येते.