Join us  

दोन्ही कसोटी सामन्यांत खेळपट्ट्या फलंदाजीसाठी कठीण नव्हत्या 

श्रीकर भरत : भक्कम बचाव हाच यशाचा मूलमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 5:43 AM

Open in App

इंदूर : बॉर्डर-गावसकर मालिकेत आतापर्यंत मिळालेल्या खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणे तितके कठीण नव्हते. ज्या फलंदाजांकडे बचावाचे भक्कम तंत्र होते, त्यांना फिरकीपटूंविरुद्ध कुठलीच अडचण गेली नसल्याचे मत भारताचा यष्टिरक्षक फलंदाज श्रीकर भरतने व्यक्त केले आहे.

वर्षभरापासून भारतीय कसोटी संघासोबत असलेल्या भरतला नागपूरमधल्या पहिल्या सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली होती. पहिल्या दोन्ही कसोटींत आपल्या यष्टिरक्षणाने सर्वांना प्रभावित करणारा भरत पुढे म्हणाला, ‘दिल्ली कसोटीत केलेली २३ धावांची छोटेखानी खेळी समाधान देणारी होती. मी मैदानावर वेगळे काहीच करण्याचा प्रयत्न केला नाही. ज्या गोष्टींचा सराव केला होता, त्याच गोष्टी खेळताना अवलंबल्या. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली की, खेळपट्टीची जेवढी चर्चा झाली तेवढी खेळण्यासाठी ती नक्कीच कठीण नव्हती. भक्कम बचाव आणि संधी मिळताच फटके या समीकरणाच्या आधारे कुठलाही फलंदाज यशस्वी होऊ शकला असता. दिल्ली कसोटीत रोहितभाईने मला आधीच सांगितले होते की, तुला सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करायची आहे. त्यानुसार मी जबाबदारीसाठी सज्ज होतो.’

दिल्ली येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत श्रीकर भरतने २२ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीने २३ धावांची खेळी केली होती. याबाबत बोलताना तो म्हणाला, ‘या खेळपट्टीवर फटक्यांची योग्य निवड करणेसुद्धा महत्त्वाचे होते. तसेच केवळ बचावात्मक पवित्रा घेतला तर विकेट जाण्याचाही धोका असतो. त्यामुळे मी नैसर्गिक खेळ करण्यावर भर दिला. मात्र, अधिक धावा करता आल्या असत्या तर मला आनंद झाला असता.’ भारतीय खेळपट्ट्यांवर अश्विन आणि जडेजाच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षण करणे सोपे काम नसते. मात्र, भरतने याबाबतीत आपले नाणे खणखणीतपणे वाजवले. तो म्हणाला, ‘जडेजा आणि अश्विन या दोन दिग्गजांपुढे यष्टिरक्षण करणे नक्कीच सोपे नव्हते. मात्र, अनेक वर्षे स्थानिक क्रिकेटमध्ये केलेल्या यष्टिरक्षणाचा मला फायदा झाला.’

संधी मिळण्याबाबत आशावादीएक खेळाडू म्हणून तुम्ही नेहमीच अपेक्षा करत असता की तुम्हाला एकतरी संधी मिळेल. त्यामुळे प्रत्येक क्षणी स्वत:ला तयार ठेवत असतो. अनेक वर्षे स्थानिक क्रिकेट आणि भारत अ संघाकडून खेळल्यानंतर मला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. ही नक्कीच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. भविष्यातही संधी मिळण्याबाबत मी आशावादी आहे, असे भरत सरतेशेवटी म्हणाला.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ
Open in App