मतीन खान, स्पोर्ट्स हेड, सहायक उपाध्यक्ष, लोकमत पत्रसमूह -
आमचा संघ जिंकला की आम्ही जल्लोषात न्हाऊन निघतो. पण पराभूत झाला तर आम्ही संघाच्या पाठीशी का नसतो? पराभवानंतरही मनोबल कायम राखण्यासाठी खेळाडूंची साथ देणे गरजेचे आहे. पराभव पचविणे आम्हाला जमतच नसावे. त्यामुळेच एखादा पराभव झाल्यास आम्ही अस्वस्थ होतो. क्रिकेट खेळणे, पाहणे आणि त्याबद्दल चर्चा करणे किंवा ऐकणे सोडून द्यावे, असे वाटू लागते.
आशिया चषकात भारताने लागोपाठ दोन सामने गमावले. दोन्ही सामन्यात एक चेंडूृ शिल्लक असताना पराभव झाला. याचा अर्थ दोन्ही सामने अखेरच्या टप्प्यापर्यंत रंगतदार झाले. भारतीय संघ एकतर्फी पराभूत झालेला नाही. टी-२०मध्ये तसेही धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकतो. दोन्ही सामने भारताने आधी फलंदाजी करताना गमावले.
पाकिस्तानने भारताला नमविल्यानंतर स्पर्धेत आव्हान टिकविण्यासाठी जो सामना जिंकणे गरजेचे होते त्यात लंकेने धूळ चारली. यामुळे आशा आणि अपेक्षांना धक्का लागला. निराशाही झाली. पण टीम इंडिया लढली आणि हरली.
काही डावपेच फसल्यामुळे आणि उणिवा चव्हाट्यावर आल्याने पराभव पदरी पडला यात काहीच शंका नाही. या उणिवांवर तोडगा निघू शकतो. आपली गोलंदाजी फारच कमकुवत वाटते. विशेषतः वेगवान गोलंदाजी. सर्वात मोठे कारण जसप्रीत बुमराहचे दुखपतग्रस्त होणे हे ठरले. अंतिम एकादश निवडीतही काही चुका झालेल्या आहेत.
पण मैदानावर जो लढतो तो क्षमतेनुरूप शंभर टक्के किंबहुना त्याहून अधिक योगदान देण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी नशीब सोबतीला नसते किंवा प्रतिस्पर्धी अधिक क्षमतावान ठरतो.
टेनिस आणि बॅडमिंटनमध्ये प्रतिस्पर्धी समोरासमोर आले की एकमेकांवर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करतात. क्रिकेटचेही तसेच आहे. येथे गोलंदाज आणि फलंदाज परस्परांवर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करतात. त्यात एक सरस ठरतो; पण याचा अर्थ असा नव्हे, की दुसऱ्याने क्षमतेनुसार काम केले नसावे. कामात आपल्याकडूनही कधी ना कधी चुका होतच असतात.
- भारतीय चाहत्यांनीही एक बाब लक्षात घ्यायला हवी, आपण क्रिकेट खेळणाऱ्या नवख्या देशातील पाठीराखे नाही. आपला संघ विश्वविजेता आणि अव्वल स्थानावर राहिलेला संघ आहे.
- आयपीएलसारख्या लोकप्रिय आणि जागतिक दर्जाच्या लीगचे आपण आयोजक आहोत. मग काही बोध घेणार की नाही? कुठलाही खेळाडू मुद्दामहून सामना गमावत नाही किंवा चुका करीत नाही. तरीही चुका होतातच. म्हणूनच तर क्रिकेटचा खेळ इतका रोमहर्षक आहे.
- ऑक्टोबरमध्ये विश्वचषकाचे आयोजन होईल. सर्वांना माहीत असेल की, भारतीय संघाने जे विश्वचषक जिंकले त्याआधीच्या मालिकांमध्ये खराब खेळ झाला होता. आपण आशिया चषकाबाहेर पडण्याच्या स्थितीत असलो तरी विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी करू, अशी आशा बाळगायला काय हरकत आहे?
ना थके कभी पैर, ना कभी हिम्मत हारी है, हौसला है जिंदगी में कुछ कर दिखाने का, इसलिए अभी सफर जारी है...
Web Title: The poison of defeat must be digested
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.