भारतात सुरू असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आता रंगत येऊ लागली आहे. स्पर्धेत खेळल्या गेलेल्या मागच्या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांत धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. त्यात अफगाणिस्तानने विश्वविजेत्या इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव केला. तर काल झालेल्या सामन्यात नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेवर ३८ धावांनी मात करत खळबळ उडवून दिली आहे. या दोन निकालांमुळे विश्वचषकातील समिकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली असून, उपांत्य फेरीची शर्यत रंगतदार बनली आहे. मात्र या वर्ल्डकपमध्ये एक असाही संघ खेळत आहे जो १९७५ पासून आतापर्यंत एकदाही धक्कादायक निकालाची शिकार झालेला नाही. या संघाचं नाव आहे न्यूझीलंड.
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक वेळा धक्कादायक निकालांची शिकार झालेल्या संघाच्या यादीत इंग्लंडचा पहिला क्रमांक लागतो. वर्ल्डकपमध्ये इंग्लंडचा संघ पाच वेळा रँकिंगमध्ये तळाला असलेल्या संघांकडून पराभूत झाला आहे. त्यात बांगलादेशने दोन वेळा, तर झिम्बाब्वे, आयर्लंड आणि अफगाणिस्तानने प्रत्येकी एकदा इंग्लंडचा धक्कादायक पराभव केला आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ ४ वेळा धक्कादायक निकालांची शिकार झाला आहे. त्यात त्यांना दोन वेळा बांगलादेशकडून तर झिम्बाब्वे आणि नेदरलँड्सने त्यांना प्रत्येकी एक वेळा पराभूत केले आहे. दोन वेळचा विश्वचषक विजेता असलेला, पण यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र न ठरलेला वेस्ट इंडिजचा संघही वर्ल्डकपमध्ये ३ वेळा धक्कादायक निकालांची शिकार झाला आहे. त्यात केनिया, आयर्लंड आणि बांगलादेश या संघांनी त्यांना पराभूत केले आहे.
तर भारत आणि पाकिस्तानच्या संघांनाही धक्कादायक निकालांची शिकार व्हावं लागलं आहे. भारताला १९७९ मध्ये तेव्हा दुबळा संघ असलेल्या श्रीलंकेनं पराभूत केलं होतं. तर १९९९ मध्ये झिम्बाब्वे आणि २००७ मध्ये बांगलादेशच्या संघाने पराभवाचा धक्का दिला होता. पाकिस्तानलाही नवख्या संघांकडून दोनवेळा धक्का बसला आहे. १९९९ मध्ये पाकिस्तानला नवख्या बांगलादेशनं पराभूत केलं होतं. तर २००७ मध्ये आयर्लंडने धक्कादायक निकालाची नोंद करताना पाकिस्तानला पराभूत केलं होतं. तर पाच वेळचा विश्वविजेता असलेल्या ऑस्ट्रेलियाला १९८३ मध्ये झिम्बाब्वेच्या संघानं पराभूत केलं होतं. तर श्रीलंकेला २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत केनियाकडून पराभूत व्हावं लागलं होतं. ही यादी पाहिल्यास केवळ न्यूझीलंड हा असा एकमेव संघ आहे. ज्याला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत कुठल्याही दुबळ्या संघाकडून पराभव स्वीकारावा लागलेला नाही. मात्र यंदाच्या विश्वचषकात लागलेले धक्कादायक निकाल पाहता त्यांनाही आता सावध राहावं लागणार आहे.