Join us  

रॉयल्स आणि सनरायजर्स विजयी सुरुवात करण्यास उत्सुक

रॉयल्सची कामगिरी कर्णधार संजू सॅमसनच्या फलंदाजीवर विसंबून असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 5:12 AM

Open in App

पुणे : अनेक मॅचविनर्सचा भरणा असलेला राजस्थान रॉयल्स आणि माजी विजेता सनरायजर्स हैदराबाद संघ मंगळवारी होणाऱ्या आयपीएल १५ च्या सलामी लढतीत विजय मिळविण्यास उत्सुक आहेत.

रॉयल्सची कामगिरी कर्णधार संजू सॅमसनच्या फलंदाजीवर विसंबून असेल.  सॅमसन गेल्या काही सत्रापासून या संघातून खेळत असला तरी अपेक्षेनुरूप कामगिरी करू शकलेला नाही.  रॉयल्सने दिवंगत शेन वॉर्नच्या नेतृत्वात २००८ ला पहिले आयपीएल जिंकले होते. मात्र, त्यानंतर या संघाने प्रभावी कामगिरी केलेली नाही. सॅमसनने दरवर्षी एक- दोन सामन्यांत दमदार खेळी केली. दुसऱ्या जेतेपदासाठी मात्र त्याला कामगिरीत सातत्य दाखवावेच लागेल. यामुळे यंदा होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळविता येईल. सनरायजर्सकडे अनुभवी फलंदाज केन विलियम्सन आणि ग्लेन फिलिप्स हे सलामीवीर असून मधल्या फळीची भिस्त निकोलस पूरण, प्रियम गर्ग आणि राहुल त्रिपाठी यांच्यावर राहील. 

जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल रॉयल्सच्या डावाची सुरुवात करतील. मधल्या फळीत शिमरोन हेटमायर, रासी वान डेर दुसेन, जिमी नीशाम आणि रियान पराग  हे आहेत. फिरकीची बाजू रविचंद्रन आश्विन आणि युजवेंद्र चहल यांच्याकडे असेल. वेगवान माऱ्यासाठी ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि नवदीप सैनी हे आहेत. 

टॅग्स :राजस्थान रॉयल्सआयपीएल २०२२
Open in App