इंडियन प्रीमिअर लीग २०२३ नंतर भारतीय संघात काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. हार्दिक पांड्याकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोपवले गेलेच आहे आणि आता IPL नंतर होणाऱ्या वन डे मालिकेतही पांड्याच नेतृत्व करताना दिसणार आहे. अफगाणिस्ताविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्याचा विचार सुरू आहे. कारण, भारतीय संघाचे वेळापत्रक खूप व्यग्र आहे आणि सीनियर खेळाडूंना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे या मालिकेत BCCI दुसऱ्या फळीतील खेळाडूंना मैदानावर उतरवण्याची शक्यता आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, परंतु ही मालिका जून महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात खेळवली जाऊ शकते. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल आणि वेस्ट इंडिज दौरा या दरम्यानच्या कालावधीत अफगाणिस्तानविरुद्धची मालिका होऊ शकते. वर्कलोड लक्षात घेता रोहित, कोहली, शमी व सिराज यांना विश्रांती देण्याचा विचार सुरू आहे. दोन महिन्यांपासून भारतीय क्रिकेटपटू आयपीएलमध्ये खेळत आहेत आणि त्यानंतर ७ ते ११ जून या कालावधीत WTC Final आहे.
त्यानंतर भारतीय संघ जुलै महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर तिन्ही फॉरमॅटच्या मॅच खेळण्यास जाणार आहे. तिथे भारताची पहिली फळी पाठवली जाईल. १२ जुलै ते १३ ऑगस्ट या कालावधीत दोन कसोटी, तीन वन डे आणि पाच ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका होईल. त्यानंतर आयर्लंडविरुद्धची तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका अपेक्षित आहे.
त्यामुळेच रोहित व कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत खेळणे शक्य नाही. त्यामुळे यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा व ऋतुराज गायकवाड यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतही रोहित, कोहली आणि हार्दिक यांना विश्रांती दिली जाऊ शकते, कारण त्यानंतर आशिया चषक खेळायचा आहे.