ICC gives verdict on Newlands pitch (Marathi News) : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातला केप टाऊन कसोटी सामना दोन दिवसांत संपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात छोटी मॅच ( चेंडूच्या बाबतीत) ठरली. भारत-दक्षिण आफ्रिका कसोटीचा निकाल ६४२ चेंडूंत लागला आणि १९३२ सालचा ( ऑस्ट्रेलिया वि. आफ्रिका, मेलबर्न) ६५६ चेंडूंचा विक्रम मोडला गेला. या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने खेळपट्टीवरून आयसीसीवर निशाणा साधला होता. देश बघून खेळपट्टीबाबत निर्णय देऊ नका, असे थेट आव्हान त्याने दिले होते आणि आज आयसीसीने खेळपट्टीचा निकाल लावला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील केप टाऊन कसोटीतील न्यूलँड्सच्या खेळपट्टीला 'असंतोषजनक' शेरा दिला आहे. आयसीसी खेळपट्टी आणि आऊटफिल्ड मॉनिटरिंग प्रक्रियेअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. या कसोटीत मोहम्मद सिराजने १५ धावातं ६ विकेट्स घेताना दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर गुंडाळला होता. भारताने १५३ धावा करून ९८ धावांची आघाडी घेतली. पण, भारताने शेवटच्या सहा विकेट्स एकही धाव न करता गमावल्या होत्या. दुसऱ्या डावात एडन मार्करामन शतक झळकावले, परंतु भारतासमोर ७९ धावांचे माफक लक्ष्यच ते ठेऊ शकले. जसप्रीत बुमराहने या डावात सहा विकेट्स घेतल्या. भारताने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला.
ICC सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी आपला अहवाल सादर केला, ज्यात मॅच रेफरींनी चिंता व्यक्त केली गेली आणि मूल्यांकनानंतर, केपटाऊनमधील न्यूलँड्सची खेळपट्टी "असमाधानकारक" मानली गेली. ब्रॉड म्हणाले, “न्यूलँड्समधील खेळपट्टीवर फलंदाजी करणे फार कठीण होते. संपूर्ण सामन्यात चेंडू झटपट आणि कधी कधी भयानकपणे उसळला, त्यामुळे शॉट्स खेळणे कठीण झाले. अस्ताव्यस्त उसळीमुळे अनेक विकेटही पडल्या.''
या खेळपट्टीला एक वजा गुण देण्यात आला आहे. त्यामुळे जर एखाद्या खेळपट्टीला ६ वजा गुण दिले जातात तर त्यांच्याकडून १२ महिन्यांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या आयोजनाचा हक्क काढून घेतला जातो. १२ वजा गुण झाल्यास हा कालावधी २४ महिन्यांचा होतो. पुढील ५ वर्षांसाठी हे गुण कायम राहणार आहेत. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला या निर्णयाविरोधात १४ दिवसांत अपील करता येणार आहे.
Web Title: The shortest match in Test history, ICC rates Cape Town pitch 'unsatisfactory' after Test between India and South Africa finishes inside two days
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.