कांदिवली (पश्चिम) येथील ग्राउंड-प्लस-आठ मजली इमारतीला सोमवारी लागलेल्या आगीत माजी आयपीएल खेळाडू पॉल वॅल्थॅटीची ( Paul Valthaty ) बहीण आणि आठ वर्षांच्या भाच्याचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी लागलेल्या आगीत तीन जण जखमी झाले.
पॉल वॅल्थॅटी इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता. ग्लोरी रॉबर्ट्स ( ४३) आणि तिचा मुलगा जोशुआ हे महावीर नगर येथील पवन धाम मंदिराजवळील वीणा संतूर या इमारतीच्या धुराने भरलेल्या मजल्यावर अडकलेले आढळले. ते तिथे कसे पोहोचले हे स्पष्ट नाही. रॉबर्ट्स चौथ्या मजल्यावर ४२० व ४२१ फ्लॅटमध्ये राहत होते. या इमारतीतील १२१ फ्लॅटच्या स्वयंपाकघरात आग लागली होती.
दुपारी १२.१५ च्या सुमारास पिंकेश जैन यांच्या मालकीच्या एफ विंगच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट १२१ च्या किचनमध्ये आग लागली आणि ती रस्त्याच्या कडेला असलेल्या वरच्या मजल्यापर्यंत पसरली. दुपारी ४.३० च्या सुमारास अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.
कुटुंबातील एका सदस्याच्या म्हणण्यानुसार, ग्लोरी तिच्या आजारी आई-वडिलांना भेटण्यासाठी आली होती. आग लागली तेव्हा संपूर्ण कुटुंब अपार्टमेंटमध्ये होते. पॉल घाईघाईने त्याची पत्नी, मुले आणि ग्लोरीच्या मोठ्या मुलीसह खाली उतरला. ग्लोरी आणि तिचा मुलगा, तसेच त्यांचे दोन घरकाम करणारे, पळण्याच्या प्रयत्नात असताना पायरीत अडकले गेल्याचे समजते.