नवी दिल्ली : ‘भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकीचा सामना करण्यासाठी स्वीप फटका हा एकमेव पर्याय नाही. फिरकीपटूंविरुद्ध यशस्वी ठरण्यासाठी चांगल्या फुटवर्कची गरज आहे,’ अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजीच्या योजनेवर टीका केली. कसोटी मालिकेत भारतीय फिरकीपटूंविरुद्ध स्वीप खेळण्याची ऑस्ट्रेलियन फलंदाजांची रणनीती सपशेल अपयशी ठरली. ऑस्ट्रेलियाच्या याच चुकीचा फायदा घेत, भारताने बॉर्डर-गावसकर चषक मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे.
चॅपेल म्हणाले, ‘फिरकी गोलंदाजीविरुद्ध सातत्याने स्वीप फटका खेळणे चांगला पर्याय नाही. जर कोणी असे करत असेल, तर तो फलंदाज कल्पकतेने आणि विचारपूर्वक कामगिरी करत नाही. काही खेळाडू स्वीप फटका मारण्यात तरबेज असू शकतात आणि त्यांनी नक्कीच या फटक्याचा फायदा घ्यावा, परंतु इतर खेळाडूंकडे इतरही पर्याय आहेत. जो फिरकीपटू चेंडूला चांगल्या प्रकारे उसळी देऊ शकतो, तो सातत्याने स्वीप खेळणाऱ्या फलंदाजाविरुद्ध नक्कीच वेगळे डावपेच आखू शकतो.’
ऑस्ट्रेलियन संघाने भारतात एकही सराव सामना न खेळण्याचा निर्णय घेतला होता. यावरही चॅपेल यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘भारतासारख्या महत्त्वपूर्ण दौऱ्याआधी ऑस्ट्रेलियात विशेष खेळपट्टी तयार करून फिरकीविरुद्ध खेळण्याचा सराव नाही करता येत. फिरकीविरुद्ध खेळताना चांगले पदलालित्य शिकावे लागेल. वेगाने क्रीझ बाहेर जाणे किंवा वेगाने बॅकफूटवर येणे शिकावे लागेल.’ चॅपेल यांनी चुकीच्या संघनिवडीविषयी सांगितले की, ‘भारत दौऱ्यात ऑस्ट्रेलियाच्या संघ निवडीत कोणतेही सातत्य दिसून आले नाही. क्रिकेटविश्वात अनेक ठिकाणी ऑस्ट्रेलियन संघाचे निवड चांगली दिसून येईल, पण भारत दौऱ्याविषयीची चिंता आधीच दिसून आली पाहिजे होती.
एका यशस्वी फलंदाजाला फिरकीस अनुकूल खेळपट्टीचा सुरुवातीच्या १० मिनिटांत अंदाज लावता यायला पाहिजे. जर फलंदाज समजूतदारपणे खेळला, जसे की रोहित शर्माने खेळ केला, तर भारतीय खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणे अशक्य नाही.’