T20 World Cup 2026 - अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे सुरू असलेला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप हा २०२६ मध्ये भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यामाने पार पडणाऱ्या वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. अमेरिकेत प्रथमच होत असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अनेक बलाढ्य संघांना धक्के बसलेले दिसतेय... पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका हे स्पर्धेबाहेर फेकले जाण्याच्या स्थितीत आहेत, तर गतविजेता इंग्लंड सुपर ८ साठी पात्र ठरेल की नाही यावरही शंका आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेतील Super 8 ही फक्त या स्पर्धेत पुढील फेरीत प्रवेश करण्याची पायरी नाही, तर याचसोबत हे ८ संघ २०२६ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.
२०२६च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भारत व श्रीलंकेला मिळाले आहे आणि यजमान म्हणून हे दोन्ही संघ आधीच पात्र ठरले आहेत. सध्या सुरू असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांनी सुपर ८ मधील एन्ट्रीसह २०२६ च्या स्पर्धेची पात्रता निश्चित केली आहे. भारत-श्रीलंका हे दोन्ही संघ यजमान म्हणून पात्र ठरल्यामुळे आता सुपर ८ मधून आणखी चार संघ २०२६ साठी पात्र ठरतील. सध्याच्या घडीला अफगाणिस्तान, नेदरलँड/बांगलादेश , अमेरिका आणि स्कॉटलंड/इंग्लंड हे संघ सुपर ८च्या शर्यतीत आघाडीवर आहेत. त्यामुळे यापैकी ४ संघ २०२६चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप नक्की खेळतील.
पाकिस्तानचं काय?
पाकिस्तानची अवस्था सध्या खूपच वाईट झाली आहे. अमेरिकेकडून लाजीरवाणा पराभव पत्करल्यानंतर भारताविरुद्ध त्यांनी पुनरागमन केले होते. पण, त्यांनी तोही हातचा सामना गमावला. कॅनडाविरुद्ध त्यांनी विजय मिळवून २ गुण कमावले, परंतु सुपर ८मध्ये जाण्यासाठी ते पुरेसे नाही. अ गटातील शेवटच्या साखळी सामन्यात त्यांना आयर्लंडचा सामना करायचा आहे, परंतु या सामन्यावर पावसाचे सावट आहे. हा सामना रद्द झाल्यास पाकिस्तानला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागेल...
पाकिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ खेळणार नाही?
पाकिस्तान जरी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या सुपर ८ साठी पात्र ठरणार नसेल तरी तो भारत-श्रीलंका होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी पात्र ठरू शकतो. सुपर ८ मधील संघ वगळल्यास जे संघ ३० जून २०२४ पर्यंत आयसीसी क्रमवारीत आघाडीवर असतील त्यांनाही २०२६च्या वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणार आहेत. पाकिस्तान सध्या ७व्या क्रमांकावर आहे आणि तो दोन वर्षानंतर होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार आहे.
Web Title: The Super 8s in T20 World Cup 2024 will also qualify for the T20 World Cup 2026 in India and Sri Lanka. USA, Scotland, Netherlands are in a good position to qualify for the next event.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.