मुंबई : लॉस एंजिलिस २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये टी-२० क्रिकेटचा थरार रंगणार आहे. सोमवारी यावर शिक्कामोर्तब झाले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झालेल्या १४१ व्या सत्रात ज्या अन्य चार खेळांना मंजुरी प्रदान करण्यात आली त्यात बेसबॉल-सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रॉझ (सिक्सेस) आणि स्क्वॅशचा समावेश आहे.
पाच नव्या खेळांच्या प्रस्तावाला ९९ सदस्यांपैकी मतदान करणाऱ्या दोनच सदस्यांनी विरोध केला. आवाजी मतदानाने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
लोकप्रियता वाढतेय : बाकआयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी ही बाब अमेरिकन क्रीडा संस्कृतीशी सुसंगत आहे आणि अमेरिकेतील तसेच जागतिक स्तरावरील नवीन खेळाडूंना आणि चाहत्यांना ऑलिम्पिक समुदायाशी संलग्न होण्यास मदत होईल, असे म्हटले.
सर्वव्यापी प्रसार : शाहबीसीसीआय सचिव जय शाह यांनी ऑलिम्पिकमध्ये समावेशामुळे क्रिकेटचा सर्वव्यापी प्रसार होईल, अशी आशा व्यक्त करीत पायाभूत सुविधा, स्पर्धा, अधिकारी, स्वयंसेवक आणि तज्ज्ञ व्यावसायिक निर्माण करण्यास क्रिकेटचा उपयोग होईल, असेही सांगितले.
कोहलीची लोकप्रियता...इटलीचे ऑलिम्पिक चॅम्पियन नेमबाज आणि २०२८ च्या लॉस एंजिलिस ऑलिम्पिकचे क्रीडा संचालक निकोली कॅम्प्रियानी यांनी विराट कोहलीच्या लोकप्रियतेचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘विराटचे जगात ३४ कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच या खेळाचे जगात अडीच अब्जाहून अधिक चाहते असल्याचे सांगितले. अमेरिकेत यंदा मेजर लीग लोकप्रिय ठरली. पुढच्या वर्षी वेस्ट इंडीजच्या सोबतीने आम्ही आयसीसी टी-२० विश्वचषकाचे आयोजन करणार आहोत.’