Join us

सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा...!!!; चाहत्यांच्या महासागरात टीम इंडियाचा विजयी जल्लोष

तब्बल १७ वर्षांनी पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यावर विश्वविजयी भारतीय क्रिकेट संघाची मिरवणूक निघाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 07:27 IST

Open in App

रोहित नाईक 

मुंबई - जल्लोष, उत्साह, आनंद, डोळे दिपवून टाकणारी गर्दी... चकाकणारे मोबाईलचे फ्लॅश... सगळी सगळी वर्णनं थिटी पडावीत असा रसरशीत अनुभव मुंबईकरांच्या साक्षीने संपूर्ण देशाने अनुभवला..! नातवापासून आजोबांपर्यंत खळाळणाऱ्या समुद्राच्या साक्षीने लाखोंचा जनसमुदाय आपल्या लाडक्या खेळाडूची एक छबी टिपण्यासाठी डोळ्यात प्राण आणून उभा होता..!

भारतीय संघाला घेऊन येणारी बस मरीन ड्राईव्ह वर पोहोचली आणि समुद्राच्या लाटांनी सुद्धा त्यांना पाहण्यासाठी जोरदार उसळ्या घेतल्या...!!! मुंबई विमानतळापासून वानखेडे स्टेडियम पर्यंत जे काही चालू होते ते मांडण्यासाठी शब्दही सापडत नव्हते... कारण तेही आपल्या आवडत्या भारतीय संघाला पाहण्यासाठी लाखोंच्या गर्दीत कधीच हरवून गेले होते...! विमानतळावर विमान उतरले तेव्हा त्यांना दिलेल्या वॉटर सॅल्यूटमध्ये विमानात बसलेल्या खेळाडूंचे आणि त्यांना पाहणाऱ्या मुंबईकरांच्या डोळ्यातील पाणीही त्या वॉटर सॅल्यूट मध्ये मिसळून गेले...!! सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा...!!!

गुरुवारचा दिवस क्रिकेट चाहत्यांसाठी विश्वविजयाचा ठरला. तब्बल १७ वर्षांनी पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यावर विश्वविजयी भारतीय क्रिकेट संघाची मिरवणूक निघाली. तो अनुभव पुन्हा एकदा मुंबईकरांनी अनुभवला. विशेष म्हणजे यावेळी कोसळलेल्या पावसानेही क्रिकेट चाहत्यांच्या उत्साहावर परिणाम झाला नाही. ज्या क्षणाची क्रिकेट चाहते प्रतीक्षा करत होते, तो क्षण अखेर भारतीय संघाने साकार केला. कर्णधार रोहित शर्माने टी-२० विश्वचषक उंचावल्यानंतर भारतीयांनी केलेला जल्लोष अजूनही कायम आहे आणि हेच गुरुवारी दिसून आले.संपूर्ण दिवस टीम इंडियाच्या नावे

  • भारतीय संघ बार्बाडाेस येथून निघाल्यानंतर पहाटे ६ वाजता दिल्ली विमानतळावर पाेहचला.  
  • पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या निवासस्थानी टीम इंडियाचे स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांनी प्रत्येकाला आपला अनुभव विचारला. बराच वेळ हसत-खेळत गप्पा रंगल्या.
  • सांयकाळी मुंबई विमानतळावर आल्यानंतर टीम इंडियाला वाॅटर सॅल्युट देण्यात आला. 
  • मरीन ड्राईव्हवर लाखाे चाहते त्यांची वाट बघत हाेते. सायंकाळी ७ वाजता विजयी मिरवणूक सुरू झाली.
  • २ तास चाहत्यांच्या महासागरात उसळलेल्या आनंदाच्या लाटा पाहत टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवर पाेहचली.
  • वानखेडेवर लाखाे चाहत्यांच्या उपस्थितीत विश्वविजयी संघाचा गाैरव साेहळा रंगला हाेता.
टॅग्स :विश्वचषक ट्वेन्टी-२०रोहित शर्माट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतीय क्रिकेट संघ