Pakistan vs England Test Series : १७ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाने कसोटी मालिका अविस्मरणीय केली. २२ वर्षांनंतर इंग्लंडनेपाकिस्तानमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. घरच्या मैदानावर डरकाळी फोडणारे पाकिस्तानचे सर्व खेळाडू बेन स्टोक्सच्या आक्रमक संघासमोर शेपूट घातलेले दिसले. इंग्लंडने रावळपिंडीनंतर मुलतान कसोटीतही रोमहर्षक विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. रावळपिंडी कसोटीच्या खेळपट्टीवरून बराच वाद झाला आणि अखेर ICC ने एक ट्विट करून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे वाभाडे काढले.
रावळपिंडी कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने ५००+ धावा केल्या... पहिल्या दोन दिवसांत दोन्ही संघानी मिळून ७ शतकं झळकावली... त्यामुळे या खेळपट्टीवर टीका झाली. आज आयसीसीच्या समितीने या खेळपट्टीला 'सुमार' दर्जा दिला आहे. इंग्लंडने ही कसोटी ७४ धावांनी जिंकली होती. पीसीबीचे अध्यक्ष रमीज राजा यांनी ही खेळपट्टी लाज आणणारी असल्याचे मत व्यक्त केले होते आणि आयसीसीच्या मॅच रेफरी एलीट पॅनलचे प्रमुख अँडी पीक्रॉफ्ट यांनीही या खेळपट्टीला सुमार दर्जा जाहीर केला. सलग दुसऱ्यांदा रावळपिंडीच्या खेळपट्टीला हा दर्जा दिला गेला आहे. यापूर्वी पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मार्चमध्ये झालेल्या कसोटीतही या खेळपट्टीवर टीका झाली होती.
''ही खेळपट्टी खूपच प्लॅट होती आणि येथे गोलंदाजांना कोणतीच मदत झाली नाही. यामुळेच दोन्ही संघांतील फलंदाजांनी खोऱ्याने धावा केल्या. आयसीसी नियमांतर्गत ही खेळपट्टी मला Below Average वाटली,''असे मत पीक्रॉफ्ट यांनी व्यक्त केले. हे डीमेरिट्स गुण पुढील पाच वर्ष कायम राहणार आहेत आणि पुढील चार वर्षांत या खेळपट्टीला अशा शेरा मिळाल्यास या खेळपट्टीवर १२ महिने बंदी घातली जाईल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"