Vitality Blast Final : इंग्लंडमध्ये पार पडलेल्या ब्लास्ट ट्वेंटी-२० स्पर्धेची फायनल रोमहर्षक झाली. हॅम्पशायर ( HAMPSHIRE) विरुद्ध लँसेशायर ( LANCASHIRE) यांच्यातला हा अंतिम सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. अखेरच्या षटकांत तर नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. अखेरच्या षटकात विजयासाठी ११ धावांची गरज असताना ऑस्ट्रेलियन गोलंदाज नॅथन एलिस ( Nathan Ellis) याने अखेरच्या चेंडूवर लँसेशायरच्या फलंदाजाचा त्रिफळा उडवला अन् हॅम्पशायरच्या खेळाडूंनी जेतेपदाचा जल्लोष साजरा केला. स्टेडियमवर आतषबाजी करण्यात आली अन् मोठ्या टीव्ही स्क्रीनवर हॅम्पशायरला ४ धावांनी विजयी असे दाखवले गेले. सर्वकाही आनंदमयी वातावरण असताना अचानक कॅमेरा मैदानावरील अम्पायरकडे वळला अन् एलिसने टाकलेला तो अखेरचा चेंडू No Ball असल्याचे अम्पायरने जाहीर केले अन् सन्नाटा पसरला...
पुढे काय झाले?
प्रथम फलंदाजी करताना हँम्पशायरची सुरुवात काही चांगली झाली नाही. त्यांचे ४ फलंदाज ६७ धावांवर माघारी परतले होते. बेन मॅकडेर्मोटने ३६ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांची आतषबाजी करताना ६२ धावा चोपल्या. रॉस व्हाईटलीने २२, ख्रिस वूडने २० धावांचे योगदान देत हँम्पशायरला ८ बाद १५२ धावांपर्यंत पोहोचवले. लँसेशायरच्या मॅट पर्किसनने २६ धावांत ४ विकेट्स, तर ल्युक वूडने २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात, लँसेशायरच्या प्रत्येक खेळाडूने योगदान दिले. किटन जेनिंग्स ( २४), स्टीव्हन क्रॉट ( ३६), कर्णधार डेन व्हिलास ( २३) व ल्युक वेल ( २७) यांनी विजयाच्या दिशेने कूच केली होती. पण, तळाच्या फलंदाजांना अपयश आले. हॅम्पशायरच्या लिएम डेवसन व जेम्स फुलर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
६ चेंडू ११ धावा...लँसेशायरला अखेरच्या षटकात विजयासाठी ११ धावांची गरज होती. ल्युक वूड व टॉम हार्टली हे दोन नवे फलंदाज क्रिजवर होते आणि नॅथन एलिस गोलंदाजीला आला. त्याने पहिल्या तीन चेंडूवर ४ धावा दिल्या आणि चौथ्या चेंडूवर वूडची ( ९) विकेट घेतली. पाचव्या चेंडूवर २ धावा घेतल्यानंतर लँसेशायरला १ चेंडूंत चार धावांची गरज होती. सहाव्या चेंडूवर एलिसने ग्रिसनचा त्रिफळा उडवला अन् जल्लोष सुरू झाला. पण, अम्पायरने तो नो बॉल दिला अन् १ चेंडू २ धाव असा सामना चुरशीचा झाला. एलिसने अखेरचा चेंडू निर्धाव टाकून हॅम्पशायरला १ धावेने जेतेपद पटकावून दिले.