Join us  

विंडीजचे खेळाडू फलंदाजीत टक्कर देतील

रोहितची फटकेबाजी पाहणे आयुष्यात सुखद अनुभव ठरतो. तो धाव घेत असताना पाहून मी सुखावलो. स्नायूदुखीचा त्रास आता राहिलेला नाही, हे दिसून आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 11:19 AM

Open in App

सुनील गावसकर

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या सामन्यात भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य असे की, जिंकण्यासाठी कुठलीही घाई केली नाही. शांतचित्त राहूनच मोठे फटके मारण्याची इच्छा पूर्ण केली. लक्ष्य कठीण नव्हते, पण छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना अनेकदा आघाडीचे फलंदाज सैरभैर होतात. अनेक फलंदाज मागे आहेत, असा विचार करतात. गाफीलपणे  हवेत फटके मारण्याच्या नादात ते बाद होतात. आघाडीची फळी लवकर बाद झाल्याने तळाच्या क्रमावर दडपण येते. यामुळे अटीतटीचा प्रसंग उद्भवतो. अशा वेळी सूर्यकुमार यादव-दीपक हुड्डा यांच्यात झालेली भागीदारी सुखद होती. दोघांनी प्रेक्षणीय फटके मारले तेदेखील जोखीम न घेता. दोघांमध्ये धावा काढण्याचा समन्वयदेखील शानदार होता.  मागच्या सामन्यात बाद होण्याच्या पद्धतीवर मंथन करीत विंडीजचे फलंदाज दुसऱ्या सामन्यात फलंदाजीचा स्तर उंचावतील यात शंका नाही. भारताला अखेरच्या दोन वन डेत कडवे आव्हान मिळू शकेल. जेसन होल्डर आणि फॅबियन ॲलन यांच्यातील भागीदारीमुळे निष्पन्न झाले की, आघाडीच्या फळीने साथ दिल्यास आव्हानात्मक लक्ष्य देता येणे शक्य असेल.  अनेकांनी सहजपणे फटके मारून स्वत:चा बळी दिला. दुसरीकडे मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, वाॅशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल यांनी दमदार मारा केला. चहलने किरोन पोलार्डला पहिल्या चेंडूवर बाद केले. वॉशिंग्टनने डेरेन ब्राव्होला पायचित केले.रोहितची फटकेबाजी पाहणे आयुष्यात सुखद अनुभव ठरतो. तो धाव घेत असताना पाहून मी सुखावलो. स्नायूदुखीचा त्रास आता राहिलेला नाही, हे दिसून आले. ईशानने स्वत:ला मागे राखून कर्णधाराला अधिक संधी दिली. पहिल्या वन डेत भारताने दाखवून दिले की आमच्याकडे अनेक शस्त्रे शिल्लक आहेत. विजयासाठी अधिक घाम गाळण्याची गरजच भासली नाही. (टीसीएम) 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजभारतवेस्ट इंडिजसुनील गावसकर
Open in App