IND vs AUS ODI: त्याच्याकडे स्पीड आहे, त्याच्या गोलंदाजीला तलवारीसारखी धार आहे आणि पिचवर त्याच्या बॉलिंगची चांगलीच दहशत आहे. हे सारं बोललं जातंय भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या मिचेल स्टार्कबद्दल. Mitchell Starc मिचेल स्टार्कने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात 8 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने विराट कोहली, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांसारख्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. टीम इंडियाच्या दिग्गज फलंदाजांना अडचणीत आणणारा हा खेळाडू एकेकाळी विकेटकीपर होता, हे फार कमी जणांना माहिती असेल. मिचेल स्टार्क विकेटकीपर वरून वेगवान गोलंदाज कसा झाला? आणि त्याच्यातील ही प्रतिभा कोणी ओळखली? हेदेखील फारसे कोणाला माहिती नसेल. एक यष्टिरक्षक-फलंदाज अचानक एवढा महान वेगवान गोलंदाज कसा बनला ते आज आम्ही तुम्हाला सांगतो...
स्टार्कने यष्टिरक्षक म्हणून केली होती कारकिर्दीची सुरुवात
मिचेल स्टार्कने अगदी लहान वयातच क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा दिली. स्टार्कने सिडनीच्या बेराला स्पोर्ट्स क्रिकेट क्लबमध्ये प्रशिक्षण सुरू केले. स्टार्क यष्टिरक्षक होता. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी तो नॉर्थ डिस्ट्रिक्ट संघात यष्टीरक्षक म्हणून खेळला. स्टार्कने वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत विकेटकीपिंग सुरू ठेवले पण त्यानंतर त्याचे आयुष्य बदलले. स्टार्कला बेराला स्पोर्ट्स क्रिकेट क्लबच्या प्रशिक्षकाने यष्टिरक्षण सोडण्याचा सल्ला दिला. त्याने स्टार्कला वेगवान गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला आणि तेथूनच सारं काही बदललं.
स्टार्कची उंची 6 फूट 5 इंच आहे. त्यामुळे तो गोलंदाजीत चांगली कामगिरी करेल असा प्रशिक्षकांना विश्वास होता. आता तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्याच्याकडे स्विंग आणि वेग दोन्हीही आहे. म्हणूनच त्याने यष्टीरक्षण सोडून गोलंदाज बनण्याचा निर्णय घेतला तो योग्यच म्हणावा लागेल. वेगवान गोलंदाज बनल्यानंतर 5 वर्षांच्या आत, स्टार्कने 2009 मध्ये शेफिल्ड शिल्डमध्ये न्यू साउथ वेल्ससाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले आणि त्यानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही.
स्टार्कची दमदार कामगिरी
मिचेल स्टार्क हा एकमेव गोलंदाज आहे जो प्रत्येक वनडेमध्ये किमान 2 विकेट घेतो. स्टार्कची प्रति सामन्यातील विकेटची सरासरी २.०१ आहे. राशिद खान 1.90 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ट्रेंट बोल्ट 1.89 आणि भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी 1.82 सह चौथ्या स्थानावर आहे. एकेकाळी विकेटकीपिंगने कारकिर्दीला सुरुवात करणारा खेळाडू आज प्रत्येक फलंदाजासाठी दहशत बनलाय असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
Web Title: The wicket keeper suddenly decided to become a bowler and now Rohit Sharma Virat Kohli are afraid of this Australian bowler Mitchell Starc
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.