सेंट जोन्स : मधल्या फळीतील एनक्रूमा बोनेर याने झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर ६४ धावांची आघाडी घेतली. इंग्लंडचा पहिला डाव ३११ धावांत संपुष्टात आणल्यानंतर विंडीजने १५७.३ षटकांत सर्वबाद ३७५ धावा केल्या. बोनेरने ३५५ चेंडूंत १२ चौकार व एका षटकारासह १२३ धावांची दमदार खेळी केली.
इंग्लंडच्या धावसंख्येचा पाठलाग करताना विंडीजने सावध परंतु भक्कम सुरुवात केली. बोनेरने दहा तास खेळपट्टीवर ठाण मांडले. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस दोन षटकांच्या आधी तो बाद झाला. बोनेरने एक वर्षाआधी वयाच्या ३२ व्या वर्षी कसोटी पदार्पण केले होते. त्याने वैयक्तिक ७३ धावांवर मिळालेल्या जीवदानाचा पूर्ण फायदा घेताना दुसरे कसोटी शतक झळकावले. वैयक्तिक १०२ आणि ११२ धावांवर खेळत असताना डीआरएसच्या जोरावर त्याने बाद होण्यापासून स्वत:ला वाचवले. बोनेरने अनुभवी जेसन होल्डरसह ७९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यानंतर जोशुआ डीसिल्वासोबत ७३, तर केमार रोचसोबत ४४ आणि वीरासॅमी पेरमोलसह ४६ धावांची भागीदारी करत विंडीजला आघाडी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. चहापानानंतर बोनेरने आपले शतक पूर्ण केले. इंग्लंडकडून क्रेग ओव्हरटन, जॅक लीच आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. ख्रिस वोक्स, मार्क वूड आणि डॅन लॉरेन्स यांनी प्रत्येकी एक बळी घेत चांगला मारा केला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : १००.३ षटकांत सर्वबाद ३११ धावा. वेस्ट इंडिज (पहिला डाव) : १५७.३ षटकांत सर्वबाद ३७५ धावा. (एनक्रूमा बोनेर १२३, क्रेग ब्रेथवेट ५५, जेसन होल्डर ४५; बेन स्टोक्स २/४२, जॅक लीच २/७९, क्रेग ओव्हरटन २/८५.)
Web Title: The Windies took the lead with Encruma Bonner's century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.