लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांचा लौकिक आहे. रोहितने मुंबई इंडियन्सला ५ वेळा, तर धोनीने चेन्नई सुपरकिंग्जला ४ वेळा विजेतेपद मिळवून दिले. मात्र, ज्यावेळी आयपीएलला सुरुवात झाली, तेव्हा एका नियमामुळे सगळी समीकरणे बदलली. नाहीतर, आज धोनी मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनला असता. हा नियम होता तो, आयकॉन खेळाडू निश्चित करण्याचा.
२००८ सालच्या आयपीएलच्या पहिल्या सत्रापूर्वी झालेल्या लिलावामध्ये बीसीसीआयने आयकॉन स्टेट्स असा एक नियम लागू केला होता. यानुसार एक स्टार खेळाडू आपल्या स्थानिक संघाकडून खेळू शकणार होता. याद्वारे प्रत्येक फ्रेंचाइजी संघाची लोकप्रियता वाढविण्याचा उद्देश होता आणि तो उद्देश साध्यही झाला.
यानुसार मुंबईकडून सचिन तेंडुलकर, कोलकाता नाइट रायडर्सकडून सौरव गांगुली, दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून (आता कॅपिटल्स) वीरेंद्र सेहवाग, किंग्ज इलेव्हन पंजाबकडून (आता पंजाब किंग्ज) युवराज सिंग, डेक्कन चार्जर्सकडून व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून राहुल द्रविड यांची नावे निश्चित झाली.
लिलाव प्रक्रियेमध्ये मुंबई संघ धोनीसाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे आधीच सांगण्यात आले होते. मात्र, सचिनसारखा स्टार आयकॉन खेळाडू असल्याने मुंबईचे बजेट प्रचंड कमी झाले होते आणि याचाच फटका बसला. चेन्नईकडे आयकॉन खेळाडू नसल्याने त्यांचे बजेट मुंबईच्या तुलनेत जास्त होते आणि या जोरावर त्यांनी लिलावामध्ये धोनीला आपल्या संघात घेतले.
आजपर्यंत धोनी चेन्नई संघाचा आधारस्तंभ ठरला आहे. यानंतर पुढच्या सत्रात हा नियम हटविण्यात आला, मात्र चेन्नई आणि धोनी हे समीकरण अधिक भक्कम झाले.