Maharashtra Lockdown Harbhajan Singh: राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाऊनची तयारी करण्याचे संकेत दिले आहेत. देशातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग यानं मुख्यमंत्री ठाकरेंच्या विधानावर रोखठोक भूमिका घेतली आहे.
राज्यातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट; धुळवडी दिवशी दिलासा
"नागरिक नियमांचं काटेकोरपणे पालन करत नसल्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हे जर असंच सुरू झालं तर लॉकडाऊनचा विचार करावा लागेल", असं विधान मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं होतं. एएनआय या वृत्तसंस्थेनं मुख्यमंत्री ठाकरेंचं विधान ट्विट केलं होतं. या ट्विटला रिप्लाय देत हरभजन सिंगनं कोरोना प्रतिबंधक नियमांना गांभीर्यानं न घेणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.
"लोक जर सांगूनही ऐकत नसतील तर लॉकडाऊन कराच. लोक केव्हा गांभीर्यानं मुद्दा समजून घेणार आहेत आणि कसा तेच कळत नाही", असा संताप हरभजननं व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात परिस्थिती गंभीरराज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्राचे आकडे मोठे असल्यानं पर्यायानं देशातील आकडेवारीतही कमालीची वाढ झाली आहे. राज्यात आज ३१ हजार ६४३ नवे कोरोना रुग्ण वाढले आहेत. तर रविवारी तब्बल ४० हजारांहून अधिक रुग्ण वाढले होते. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे.