नवी दिल्ली : आयपीएल २०२३ मध्ये अर्ध्या टप्प्यात कर्णधारपदाचा प्रस्ताव आला असता, तर मी तो नम्रपणे नाकारला असता, असा खुलासा दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू अक्षर पटेलने शनिवारी केला. प्ले ऑफ शर्यतीबाहेर झालेल्या दिल्लीसाठी हे सत्र वाईट स्वप्नासारखे ठरले. संघाने १३ पैकी पाच सामने जिंकले असून गुणतालिकेत संघाचे शेवटून दुसरे स्थान आहे.
डेव्हिड वॉर्नरच्या संघाची सुरुवात फारच खराब झाली. संघाने सलग पाच सामने गमावले. त्यामुळे माजी खेळाडूंनी उपकर्णधारपद सांभाळणाऱ्या अक्षरकडे नेतृत्व सोपविण्याची वारंवार मागणी केली होती. नियमित कर्णधार ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत वॉर्नरकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. नेतृत्वाच्या अफवांबाबत विचारताच अक्षर म्हणाला, 'स्पर्धेच्या मध्येच नेतृत्व बदलल्याने संघाची लय बिघडते. माझ्याकडे कर्णधारपद आले असते तरी मी ते स्वीकारले नसते. आपला संघ खराब फॉर्ममध्ये जात असल्याने अशा गोष्टी परिस्थिती आणखी बिघडवू शकतात. व्यवस्थापनाने खेळाडू आणि कर्णधाराला पाठिंबा देण्याची गरज असते. लीगच्या मध्ये कर्णधार बदलल्याने चुकीचा संदेशदेखील जातो, असे पटेल म्हणाला.
मी नेतृत्व केले असते तरी काही गोष्टी सुधारल्या असत्या का? आम्ही सांघिकरीत्या अपयशी ठरलो. कर्णधाराला दोष देऊन भागणार नाही. मी नेतृत्व स्वीकारण्याविषयी कधीही बोललो नाही. मला ते सोपविण्यात आले असते तरी स्वीकारले नसते; कारण ड्रेसिंग रूममधील वातावरण बिघडविण्याचा कुठलाही हेतू नव्हता,' असे अक्षरने म्हटले आहे. अक्षरने यंदा दिल्लीकडून २६८ इतक्या धावा काढल्या, शिवाय १३ सामन्यांत ११ बळी घेतले आहेत.