नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये सत्ताबदल झाल्याचा परिणाम त्यांच्या भारताबरोबरच्या सामन्यांवर व्हायला सुरुवात झाली असल्याचे तुम्हाला वाटत असेल, तर तसे अजिबात नाही. पण आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील कार्यक्रम पाहता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 19 सप्टेंबरला होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील क्रिकेट संघ बऱ्याच कालावधीनंतर आशिया चषकामध्ये समोरासमोर येणार होते. पण आता हा सामना 19 सप्टेंबरला खेळवता येऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या गोष्टीला कारण ठरते आहे ते आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक.
आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांचा सामना 19 सप्टेंबरला होणार आहे. पण 18 सप्टेंबरला भारताचा सामना होणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धचा सामना कसा खेळेल, हा सर्वात मोठा पेच आहे. याबाबत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने आशिया चषकाच्या कार्यक्रमावर टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, " आशिया चषकामधील सामने ठरवताना डोक्याचा वापर केला गेलेला दिसत नाही. कोणताही संघ लागोपाठ दोन सामने कसे खेळू शकतो. या सामन्यासाठी भारताला विश्रांती नाही, तर पाकिस्तामला दोन दिवस विश्रांती देण्यात आली आहे. ही गोष्ट कोणालाही पटण्यासारखी नाही. त्यामुळे 19 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धचा सामना होण्याची शक्यता कमी आहे."