Join us  

...तर भारत अंतिम सामना खेळेल

दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका यांच्यात खेळला जाईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 3:50 AM

Open in App

सिडनी : टी २० महिला विश्वचषक स्पर्धेच्या दोन्ही उपांत्य सामन्यादरम्यान पावसामुळे खेळ रद्द झाल्यास भारत आणि द. आफ्रिका संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील. हे दोन्ही संघ आपापल्या गटात अव्वल राहिले होते, हे विशेष. भारताविरुद्ध पहिल्या उपांत्य सामन्यात पावसामुळे खेळात व्यत्यय आल्यास राखीव दिवस ठेवावा, ही क्रिकेट आॅस्ट्रेलियाने केलेली मागणी आयसीसीने फेटाळली. या सामन्यानंतर दुसरा उपांत्य सामना आॅस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका यांच्यात खेळला जाईल. दोन्ही उपांत्य सामन्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सीए प्रमुख केविन रॉबर्ट्स यांनी स्पर्धेच्या नियमानुसार आयसीसीने राखीव दिवस ठेवण्यास नकार दिल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘हवामानाचा अंदाज असला तरी एमसीजी मैदानावर पाणी काढण्याची यंत्रणा फार चांगली आहे. आयसीसीच्या स्पर्धा नियमानुसार किमान २० षटकांचा सामना झाला पाहिजे. त्यात दोन्ही संघांना प्रत्येकी १० षटके मिळावीत. २० षटकांचा सामना होऊ न शकल्यास १०, १२ किंवा १८ षटकांचा सामना खेळण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.’मीडियातील वृत्तानुसार मात्र आयसीसी प्रवक्त्याने टी२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस न ठेवण्याच्या निर्णयाचा बचाव केला. राखीव दिवसामुळे स्पर्धा लांबलचक रंगली असती, असे आयसीसीचे मत आहे. याआधी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ब गटातील अंतिम साखळी सामनादेखील पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द झाला होता. (वृत्तसंस्था)>भारतापुढे इंग्लंडचे आव्हानअपराजित भारतीय संघाला गुरुवारी इंग्लंडविरुद्ध उपांत्य पहिल्या सामन्यात बाजी मारुन पहिल्यांदाच टी२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याची सुवर्णसंधी असेल. भारत आतापर्यंत सर्वोत्कृष्ट कामगिरीसह अ गटात अव्वल स्थानावर राहिला. मागच्या सात स्पर्धांमध्ये कधीही अंतिम फेरी गाठू न शकलेल्या भारताला यंदा मात्र जेतेपद मिळवण्याचा विश्वास आहे. भारताने मोहिमेची सुरुवात चारवेळचा विजेता आॅस्ट्रेलियाला धूळ चारून केली. पाठोपाठ बांगलादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांना नमवून आठ गुणांची कमाई केली.भारतीय संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये असला तरी रेकॉर्ड मात्र इंग्लंडच्या बाजूने आहे. टी२० विश्वचषकात आतापर्यंत दोन्ही संघांदरम्यान झालेले सर्व पाचही सामने इंग्लंडने जिंकले आहेत. वेस्ट इंडिजमधील मागच्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताचा आठ गडी राखून पराभव केला होता. त्याआधी २००९, २०१२, २०१४ आणि २०१६ ला देखील भारतावर मात केली होती. सध्याच्या संघातील ७ खेळाडू २०१८ च्या उपांत्य सामन्यात खेळल्या होत्या, त्यामुळे मागील पराभवाचा वचपा काढण्याची भारताकडे हीच संधी असेल.भारताने विश्वचषकाआधीच्या तिरंगी मालिकेत इंग्लंडला हरविले असल्याने आत्मविश्वास उंचावला आहे. भारताची मुख्य मदार शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, कर्णधार हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती या फलंदाजांसह शिखा पांडे, राधा यादव आणि पूनम यादव या गोलंदाजांवर आहे. तसेच प्रमुख फलंदाज स्मृती मानधनाला सूर गवसल्यास इंग्लंडपुढे अडचणी वाढतील. इंग्लंडने तीन विजय आणि एका पराभवासह दुसरे स्थान घेत, उपांत्य फेरीत स्थान मिळविले. या संघात दिग्गज खेळाडंूचा भरणा असल्याने, भारतीय गोलंदाजांपुढे त्यांना बाद करण्याचे आव्हान असेल. >शेफालीमुळे संघात सकारात्मकता आली‘शेफाली वर्माच्या सातत्यपूर्ण आक्रमक खेळीमुळे संघात सकारात्मक वृत्तीचा संचार झाला, शिवाय मैदानावर आनंदी वातावरण राखण्यास मदत झाली. शेफालीचा स्वभाव खोडकर आहे. ती खेळाचा आनंद लुटत असल्याने संघात सकारात्मकता घेऊन आली याचा अभिमान आहे. फलंदाजी करताना शेफाली दडपण कमी करीत असल्याने इतरांना प्रेरणा देते. संघाला नेहमी अशाप्रकारच्या खेळाडूंची गरज असते. भारतीय संघ अनेक दिवसांपासून एकत्र असल्यामुळे शेफालीसारख्या इतरही खेळाडूंना स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी अनुकूल वातावरण मिळत आहे. अनेकींनी एकमेकींपासून बरेचकाही शिकले. संघात एकोपा असल्यामुळे शेफालीसारख्या नव्या दमाच्या खेळाडूंनाही प्रेरणा मिळते.’- हरमनप्रीत कौर, भारत-कर्णधार>पूनमची गोलंदाजी महत्त्वपूर्णफिरकीपटू पूनम यादवचा मारा खेळून काढणे निर्णायक ठरेल. आम्ही पूनमविरुद्ध फार चांगला अभ्यास केला आहे. मागच्या विश्वचषकातही तिचा मारा सहज खेळून काढला. पूनमचे चेंडू कसे टोलवायचे याची तयारी संघव्यवस्थापनाने करून घेतली. पूनमशिवाय शिखा पांडे, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शर्मा यांचे चेंडू यशस्वीपणे टोलविण्याचा आम्हाला विश्वास आहे.- हीथर नाईट, इंग्लंड - कर्णधार>उभय संघ यातून निवडणारभारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, स्मृती मानधना, शिखा पांडे, पूनम यादव, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती, तानिया भाटिया, राधा यादव, अरुंधती रेड्डी, हरलीन देओल, राजेश्वरी गायकवाड, रिचा घोष आणि पूजा वस्त्रकार>इंग्लंड : हीथर नाईट (कर्णधार), टॅमी ब्युमोंट, कॅथरीन ब्रंट, केट क्रॉस, फ्रेया डेव्हिस, सोफी एकलेस्टोन, जार्जिया एल्विस, सारा ग्लेन, एमी जोन्स, नताली स्किवर, आन्या श्रुबसोल, मॅडी विलियर्स, फ्रेन विल्सन, लॉरेन विनफील्ड आणि डेनी वॅट.