दुखापतीतून पूर्णपणे बरे झालेल्या केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांचे आशिया चषक संघात पुनरागमन झाल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी स्वागत केलं. हे दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे बराच काळ संघाच्या बाहेर होते. केएल राहुलच्या दुखापतीबाबत अद्याप परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही, यावर टीकाही करण्यात येत आहे. दरम्यान, केएल आशिया चषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमधून केएल राहुल बाहेर राहू शकतो असं वृत्त आहे."विश्वचषकापूर्वी प्रत्येक खेळाडूची चाचणी घेतली पाहिजे. आशिया चषक कोणत्याही खेळाडूची फिटनेस टेस्ट घेण्यासाठी महत्त्वाचा मंच आहे," असं कपिल देव म्हणाले. "प्रत्येक खेळाडूची फिटनेस टेस्ट होणं आवश्यक आहे. विश्वचषक स्पर्धा आता जवळ आली आहे. परंतु आतापर्यंत तुम्ही खेळाडूंना संधी दिली नाही. जर ते थेट विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात खेळले आणि दुखापतग्रस्त झाले तर काय होईल याचा विचार करा. याची किंमत संपूर्ण टीमला मोजावी लागेल," असं ते म्हणाले."इथे किमान गोलंदाजी आणि फलंदाजीची संधी तरी मिळेल. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. विश्वचषक सामन्यादरम्यान कोणता खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर ही वाईट बाब ठरेल. जे खेळाडू दुखापतीतून बाहेर आले, त्यांना संधी देण्याची गरज आहे. जर ते फिट असतील तर विश्वचषकातील सामने खेळू शकतात," असं कपिल देव यांनी नमूद केलं.
टॅलेंटची कमतरता नाही"आपल्याकडे टॅलेंटची कमतरता नाही. जर खेळाडून फिट नसेल, तर त्यांच्याकडे विश्वचषक स्पर्धेतील संघात बदल करण्याची संधी असेल. तुमच्याकडे या स्पर्धेसाठी उत्तम टीम तयार करण्याची संधी आहे. आशिया चषक यासाठी सर्वोत्तम प्लॅटफॉर्म आहे. या खेळाडूंची चांगली कामगिरी पाहायची आहे. परंतु त्यांच्याबद्दल मनात कोणतीही शंका असेल तर त्यांना संघात घेऊ नये," असंही त्यांनी स्पष्ट केलं.जर तुम्ही त्यांना संधी दिली नाही, तर हे केवळ खेळाडूंसाठीच नाही, तर सिलेक्टर्ससाठीही चुकीचं असेल. विश्वचषकाचे सामने भारतात होत आहे. परंतु यासाठी तुम्हाला सर्वोत्तम आणि सर्वात फीट टीम निवडावी लागेल, असा सल्लाही कपिल देव यांनी दिला.