अहमदाबाद : इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर बाद झाल्यानंतर विराट कोहलीची आक्रमक प्रतिक्रिया त्याला अडचणीत आणू शकते. त्याच्यावर निलंबनाची कारावाई होऊ शकते. दरम्यान, निलंबनाच्या कारवाईबाबत माहिती मिळालेली नाही. निलंबनाची कारवाई लगेच किंवा विलंबनाही होऊ शकते. शनिवारी झालेल्या अंतिम टी-२० सामन्यात घडलेल्या घटनेनंतर कोहलीवर आयसीसी संहिता २.५ नुसार आरोप निश्चित होऊ शकतात. त्यात अभद्र भाषेचा वापर, फलंदाज बाद झाल्यानंतर इशारे किंवा आपल्या कृत्यामुळे प्रतिस्पर्धी फलंदाजाला चिथवणे आदींचा समावेश आहे. हा लेव्हल-१ चा गुन्हा आहे. त्यासाठी दोन डिमेरिट अंक दिले जाऊ शकतात. जर कोहलीवर निलंबनाची कारवाई झाली तर तो इंग्लंडविरुद्ध सुरुवातीच्या दोन एकदिवसीय सामन्यांतून बाहेर होऊ शकतो.
इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर कोहलीवर एका कसोटी सामन्याच्या निलंबनाचे संकट होते. त्यावेळी कोहलीने मैदानावरील पंचासोबत वाद घातला होता. त्यातून तो बचावण्यात यशस्वी ठरला. कोहलीच्या नावावर दोन डिमेरिट अंकांची यापूर्वीच नोंद आहे आणि आयसीसी आचार संहितेनुसार जर एखाद्या खेळाडूच्या नावावर २४ महिन्यांत चार किंवा त्यापेक्षा अधिक डिमेरिट अंकाची नोंद झाली, तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई होते.