- अयाझ मेमन (संपादकीय सल्लागार)आयपीएलमध्ये कोणता संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे, हा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे. मला वाटते की, गेल्या दहा वर्षांची कामगिरी पाहता, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स हे संघ मजबूत आहेत आणि त्यांच्याकडेच सर्वांचे लक्ष असते. त्याचे कारणही तसेच आहे. या संघांचे आयकॉन्स खेळाडू हे स्टार आहेत किंवा त्या संघाचे मालक तरी लोकप्रिय आहेत.आठही संघ तुल्यबळ आहेत, शिवाय खेळाडूंची यादी पाहिली तर कोणता संघ सर्वात मजबूत आहे, हे सांगणे कठीण होईल. परदेशी खेळाडू, युवा खेळाडू व अनुभवी भारतीय यांचे मिश्रण संघाला मजबूत बनविते, हे सर्वच संघांतील साम्य आहे. आयपीएल ही इंग्लिश फुटबॉल प्रीमियर लीगसारखी वाटते. या लीगमध्ये सुरुवातीलाच चार प्रमुख संघ कोणते असतील, हे सांगता येते. मात्र, आयपीएलमध्ये हे सांगणे कठीण होते. गेल्या वर्षी चेन्नईच्या कामगिरीवर सुरुवातीला प्रश्नचिन्ह होते. मात्र, तेच विजेते ठरले होते.बीसीसीआयने वाडाच्या अंतर्गत काम करावे, त्यात वेअर अबाउट्सच्या नियमावर बीसीसीआयला प्रश्न आहे. त्या नियमालाच सर्वांनी होकार दिला. फक्त बीसीसीआयने त्याला सहमती दिली नव्हती. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होता. मात्र, माझ्यामते, हा नियम योग्यच आहे. क्रिकेट आॅलिम्पिक चळवळीत नसल्याने वाडाशी वाद घेणे परवडू शकते. मात्र, आता वाडाच्या नियमांसह चालण्याची वेळ आली आहे.भारतीय संघात चौथ्या स्थानासाठी चार ते पाच खेळाडू त्यांच्यावर भारतीय संघ व्यवस्थापनाने आयपीएलमध्ये लक्ष द्यावे. रिषभ पंत, लोकेश राहुल, अंबाती रायुडू हे फारसा चांगला खेळ करू शकले नाहीत. त्यामुळे भारतीय संघाला पुन्हा त्यांना पारखून घ्यावे लागेल. दिलीप वेंगसरकर यांनी अजिंक्य रहाणेचे नाव या स्थानासाठी सुचविले असून ते काही प्रमाणात योग्य आहे, तर सौरव गांगुलीने चेतेश्वर पुजाराचे नाव सुचवून गुगली टाकली.एखादा खेळाडू आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत असेल, तर त्याला निवड समिती टाळू शकेल का किंवा विराट कोहली व प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एखादा हुकमी एक्का ठरविला असेल. रहाणेला आयपीएलमध्ये छाप पाडण्याची संधी आहे. त्यातून त्याला विश्वचषकात संधी मिळू शकते. आयपीएलचा पहिला एक महिना झाल्यानंतरच २२ एप्रिलच्या आधी संघाची निवड जाहीर होईल.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- आयपीएलमध्ये आठही संघ तुल्यबळच
आयपीएलमध्ये आठही संघ तुल्यबळच
गेल्या दहा वर्षांची कामगिरी पाहता, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स हे संघ मजबूत आहेत आणि त्यांच्याकडेच सर्वांचे लक्ष असते.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 5:07 AM