'इंडिया' की 'भारत'वरून रान पेटलं; वीरेंद्र सेहवागनं राष्ट्रीय पक्षांना चांगलंच झोडलं, वाचा सविस्तर

virender sehwag twitter : दिल्ली येथे जी-२० परिषदेचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन नवीन वाद सुरू झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 01:40 PM2023-09-06T13:40:16+5:302023-09-06T13:40:52+5:30

whatsapp join usJoin us
There are good people in both national parties and there are also very many incompetent people in both parties says virender sehwag on india or bharat name controversy | 'इंडिया' की 'भारत'वरून रान पेटलं; वीरेंद्र सेहवागनं राष्ट्रीय पक्षांना चांगलंच झोडलं, वाचा सविस्तर

'इंडिया' की 'भारत'वरून रान पेटलं; वीरेंद्र सेहवागनं राष्ट्रीय पक्षांना चांगलंच झोडलं, वाचा सविस्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दिल्ली येथे जी-२० परिषदेचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन नवीन वाद सुरू झाला आहे. या पत्रिकेवर देशाचा उल्लेख 'इंडिया'ऐवजी भारत केल्याने विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले. आपल्या देशाचे नाव 'इंडिया'ऐवजी 'भारत' करण्याची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने देखील या वादात उडी घेत 'इंडिया' हे नाव ब्रिटीशांनी दिले असल्याने विश्वचषकात भारताच्या जर्सीवर केवळ भारत असा उल्लेख करायला हवा, अशी मागणी केली. वीरूचे हे विधान राजकीयदृष्ट्या असल्याचे म्हणत चाहत्यांनी त्याला डिवचले. यानंतर सेहवागने आपली भूमिका स्पष्ट करताना देशातील राष्ट्रीय पक्षांचा समाचार घेतला.

देशाच्या नावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली असताना सेहवागने सोशल मीडियावर एक पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधले. सेहवागने म्हटले, "आपल्या राष्ट्राला 'भारत' असे संबोधले जावे अशी लोकांची इच्छा असणं ही राजकीय गोष्ट म्हणून पाहिली जाते तेव्हा हसू येते. मी कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाचा चाहता नाही. दोन्ही राष्ट्रीय पक्षात चांगले लोक आहेत आणि दोन्ही पक्षात खूप अक्षम लोक देखील आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो की, माझी कोणतीही राजकीय आकांक्षा नव्हती. मला जर तसे करायचे असते तर दोन्ही पक्षांना गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये आनंदाने स्वीकारले असते. मला असे काही करावे लागले तर, मैदानावरील कामगिरी कोणत्याही पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी पुरेशी होती. मनापासून बोलणे हे राजकीय आकांक्षेपेक्षा वेगळे आहे. माझा रस केवळ 'भारत' या नावात आहे."

तसेच विरोधक स्वत:ला I.N.D.I.A म्हणवून घेत आहेत, ते स्वतःला B.H.A.R.A.T देखील म्हणू शकतात. असे बरेच हुशार लोक आहेत जे त्यासाठी योग्य पूर्ण फॉर्म सुचवू शकतात. काँग्रेसने तर 'भारत जोडो' नावाची यात्रा काढली होती. दुर्दैवाने अनेकांना 'भारत' या शब्दाबद्दल असुरक्षित वाटते. पण, जर आपल्याला 'भारत' या नावाने राष्ट्र म्हणून संबोधले गेले तर मला खूप समाधान मिळेल, असेही सेहवागने म्हटले. 

वीरूची बीसीसीआयकडे आग्रही मागणी
५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. बीसीसीआयला सल्ला देताना सेहवागने सांगितले की, मला नेहमीच वाटते की, आपल्यामध्ये अभिमान जागृत करणारे नाव असावे. आम्ही भारतीय आहोत, इंडिया हे ब्रिटीशांनी दिलेले नाव आहे आणि आमचे मूळ नाव 'भारत' आहे. हे नाव अधिकृतरीत्या परत मिळण्यास बराच काळ लोटला आहे. त्यामुळे मी बीसीसीआय आणि जय शाह यांना आग्रह करतो की, आगामी विश्वचषकात आमच्या खेळाडूंच्या छातीवर अर्थात जर्सीवर 'भारत' असेल याची खात्री करावी. तसेच विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर झाल्यानंतर सेहवागने बीसीसीआयच्या पोस्टवर व्यक्त होताना टीम इंडिया नाहीतर टीम भारत करण्याचा सल्ला दिला.

Web Title: There are good people in both national parties and there are also very many incompetent people in both parties says virender sehwag on india or bharat name controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.